Advertisement
बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेशतात्या गालफाडे यांनी राजीव आवळे यांच्याबाबत व्यक्त केली खंत
सोलापूर : इचलकरंजी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रम पत्रिकेत "बहुजन रयत परिषदे'चे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेशतात्या गालफाडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत, तुम्ही बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी होता. आमदार कोणामुळे झाला होता हे तुम्ही विसरले असून मी जर आमदार झालो तर लक्ष्मण ढोबळे यांना विसरणार नाही, असा टोला लगावला आहे.इंचलकरंजी येथे झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजक असलेले माजी आमदार राजीव आवळे यांनी बहुजन रयत परिषदेचे नाव कार्यक्रम पत्रिकेत वापरले परंतु, या परिषदेचे संस्थापक अध्यक्ष असलेले लक्ष्मण ढोबळे यांचे नाव मात्र कोठेही घेतलेले नाही. याबाबत बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गालफाडे यांनी माजी आमदार आवळे यांच्यासह आयोजकांवर टीका केली.
इंचलकरंजी येथे घडलेल्या या प्रकाबाबत प्रदेशाध्यक्ष गालफाडे म्हणाले की, 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जयवंतराव आवळे आणि भास्कर शेटे यांच्यात लढत होईल, असे सर्वांना वाटत असताना जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना झाली आणि या
पक्षाचे नेते विनय कोरे यांनी जयवंतराव आवळे यांचे पुतणे राजीव किसन आवळे यांना उमेदवारी दिली. राजीव आवळे यांनी बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून मतदार संघातील विविध गावांत पोहचण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वीही झाला. बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम केले त्यांचा त्यांना फायदाच झाला. भल्याभल्यांना घरचा रस्ता दाखवत आमदारकी मिळवली. त्यांतर त्यांनी 16 डिसेंबर 2020 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत प्रवेश केला, आता, त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मानाचे स्थान दिलेले आहे. परंतु, असे असताना इंचलकरंजीत कार्यक्रम घेताना त्यांना बहुजन रयत परिषदेची आठवण झाली, याचे आम्हाला समाधान आहे. परंतु, कार्यक्रम पत्रिकेत आमच्या बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांच्या नावाचा साधा उल्लेखही आवाळे यांनी केलेला नाही, याची मोठी खंत वाटते. आपण, ज्या बहुजन रयत परिषदेमुळे आमदारकीपर्यंत पोहचला त्याच परिषदेच्या संस्थापक अध्यक्षांचा आपल्याल विसर पडतो, ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. सध्या, मी या परिषदेचा प्रदेधाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. पण, मी आमदार झालो तर बहुजन रयत परिषद आणि आमचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांना विसरणार नाही, असे रमेशतात्या गालफोडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पायाला भिंगरी बांधल्यासारखे आमचे ढोबळे साहेब बहुजन रयत परिषदेचे काम करत आहेत. या वयातही प्रचंड काम करणारा नेता महाराष्ट्रात दुसरा कुणी नाही, हे नकारता येणार नाही. ढोबळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली 30 वर्षापासून बहुजन पदाधिकारी, कार्यकर्ते गरीब व वंचित वर्गासाठी काम करीत आहेत, झटत आहेत. परिषदेचे काम करत असताना अनेक जण साहेबांमुळे मोठे झाले आहेत. पण, त्यांनी त्याचे कधी श्रेय घेतलेले नाही. पण, जे मोठे झाले त्यांनी तरी याची जाण ठेवावी, अशी अपेक्षा पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत अल्याचे रमेशतात्या गालफाडे यांनी सांगितले.
