Advertisement
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याशी केली चर्चा
सोलापूर : राज्याचे वन, सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभा निवडणूक प्रचारार्थ दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर जात आहेत. पक्षाच्या निर्देशानुसार विजयपूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी या मतदारसंघात ते दोन दिवस प्रचार करणार आहेत. तत्पूर्वी सोलापुरात त्यांनी या पार्श्वभूमीवर माजी मंत्री ज्येष्ठ नेते प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी मुनगंटीवार यांचे स्वागत बहुजन रयत परिषदेच्या प्रदेधाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले.विजयपूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी विधानसभा मतदार संघाचे भाजपा उमेदवार सोमानगौडा पाटील यांच्या प्रचारासाठी मुनगंटीवार सकाळी 11 वाजता विजयपूर येथे दाखल होतील. सोलापुरात ते थांबलेले असताना त्यांनी माजी मंत्री ढोबळे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ऍड. कोमलताई साळुखे-ढोबळे यांच्याशीही संवाद साधला. तेथून ते देवर हिप्परगीकडे रवाना झाले. भाजपचे प्रांतिक सदस्य असलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा कर्नाटकातही चांगला संपर्क आहे. काही महिन्यांपूर्वी ढोबळे यांच्या एका शब्दांतील आमंत्रणावर एका धार्मिक कार्यक्रमात कर्नाटकात अनेक मान्यवर आले होते. ढोबळे यांचा कर्नाटकातील विविध नेते मंडळींशी चांगला संपर्क आणि संवाद आहे. यापार्श्वभूमीवर कर्नाटक दौऱ्यापूर्वीची मुनंगटीवार आणि प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची भेट वैशिष्ठ्यपूर्ण मानली जात आहे.
दरम्यान, कर्नाटकातील भाजपा उमेदवार सोमानगौडा पाटील यांची भेट घेऊन ते चर्चा करणार आहेत त्यानंतर स्थानिक भाजप आणि भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मतदार संघात विविध गावांमध्ये बैठका आणि जनसंपर्क अभियानात ते सहभागी होणार असल्याबाबत चर्चा झाल्याचे बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले. यावेळी बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

