Advertisement
मुंबई : अजित पवारांनी अखेर मीडियासमोर येत चर्चा फेटाळून लावल्या. आपण राष्ट्रवादीसोबतच असल्याचं सांगितल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या इफ्तार पार्टीत सहभागी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभागाच्या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला अजित पवार आले. या कार्यक्रमाला शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज सहभागी झाले आहेत.
भाजपमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार जाणार असल्याच्या अफवांना पेव फुटलं होतं. अजित पवारांनी अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम देत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं ठणकावलं. कारण नसताना काही लोकं गैरसमज पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. काही लोकांकडून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या बातम्यांमध्ये कोणतंच तथ्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जोपर्यंत जिवात जीव आहे, तोपर्यंत पक्षासोबत राहाणार अशी ग्वाहीही अजित पवारांनी दिली. पक्ष सोडण्याच्या या चर्चा थांबवा, तुकडा पाडा, असं म्हणत अजित पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
