Advertisement
ठाणे: 'एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार आणि लाळघोटपणा करणारा उपमुख्यमंत्रिपद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्रिपद मिरवत आहे. त्यांच्या एका कार्यकर्त्यावर मिंधे गटाने हल्ला केला तरी त्यावर कारवाई करायला हलायला तयार नाही, अशी विखारी टीका उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
ठाण्यात शिवसेना महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रोशनी शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ठाण्यातील मारहाणीच्या घटनेचा निषेध केला आहे. ठाण्यात रोशनी शिंदेंना मारहाण करण्यात आली. ठाण्यात महिला गुंडांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केली, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावरून त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात मुख्यमंत्री आहेत की गुंडमंत्री असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.
