Advertisement
अलिबाग : राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आज दुसऱ्यांदा बोट अपघातातून बचावले आहेत. सोमवारी सकाळी अलिबाग येथून परतत असताना हा अपघात झाला आहे. याआधीही अलिबागवरुन परतत असताना मंत्री उदय सामंत यांची बोट भर समुद्रात बंद पडली होती. आता पुन्हा एकदा अलिबागवरुन येत असताना उदय सामंत यांच्या बोटीला मांडवा येथे अपघात झाला. सामंत यांच्या स्पीडबोटवरील कॅप्टनचे नियंत्रण सुटले आणि बोट धक्क्यावर आदळता आदळता अगदी थोडक्यात बचावली. खु्द्द उदय सामंत यांनी हा किस्सा पत्रकार परीषदेनंतर अनौपचारीक गप्पा मारताना सांगितला आहे.
किल्ले रायगडावर 350 वा राज्याभिषेक सोहळा पार पडतो आहे. त्या निमित्ताने तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे,कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला मंत्री उदय सामंत सोमवारी सकाळी स्पीडबोटने अलिबागला यायला निघाले होते. समुद्रात बोटीचा वेग कमी होता. मात्र मांडवा जेटीजवळ बोट आली असता चालकाने बोटीचा वेग वाढवला. यामुळेच त्याचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट वेगाने जेट्टीकडे गेलली. सुदैवाने ही बोट जेट्टीवर आदळली नाही आणि उदय सामंत अगदी थोडक्यात बचावले.
