Advertisement
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चित्रीत झालेल्या अश्लील रॅप साँग शूटप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केले. कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू होती. या बैठकीत आंदोलक विद्यार्थी घुसले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरवाजे, खिडक्यांच्या काचा फोडल्या. कागद उधळले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी धुडगूस घातला. विद्यापीठात श्लील रॅप साँग शूट केल्याचा आरोप करत व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून तोडफोड केली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तासभर आंदोलन सुरू होते. त्यामुळे कुलगुरूंना व्यवस्थापन परिषदेची बैठक थांबवावी लागली. मात्र, आम्ही संवैधानिक मार्गाने आंदोलन केले. कुठलिही तोडफोड केली नाही, असा दावा अभाविपच्या आंदोलकांनी माध्यमांशी बोलताना केला.
व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलक आक्रमक होताच सुरक्षारक्षकांनी कुलगुरूंना सुरक्षा पुरवली. दरम्यान, या प्रकरणी एका चौकशी समितीची स्थापना केल्याचे समजते. या समितीची आज पहिली बैठक आहे. त्यांनी योग्य तो निष्कर्ष काढल्यावर संबंधितावर कारवाई करू, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले आहे.
