Advertisement
महिला पोलीस अधिकारी, महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र महिला कक्ष, उपलब्ध करून देण्याची मागणी
पिंपरी : सांगवी पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वंतत्र महिला कक्ष, स्वच्छतागृह सुविधेसह नसल्याकारणाने गैरसोय होत आहे. महिला कर्मचाऱ्यांना शेजारील सोसायटीच्या चेंजीग रूमचा आधार घ्यावा लागत असल्याने कायद्याचे रक्षण करणाऱ्या या रणरागिणींची कुंचबना होत आहे, याकामी लक्ष द्यावे सदर सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्याकडे बहुजन रयत परिषदेच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा ऍड. शुभा पिल्ले यांनी केली आहे.
आमदार अश्विनी जगताप यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेत ऍड. शुभा पिल्ले यांनी त्यांच्या सदर मुद्यांवर सविस्तर चर्चा केली. कायद्याची अंमलबावणी करण्यासह दररोजचे मोर्चे, आंदोलन यावरील बंदोबस्त, रात्रपाळीचे कर्तव्य बजावत असताना महिला पोलीस कर्मचाऱ्यांची वंतत्र महिला कक्ष, स्वच्छतागृहा अभावी गैरसोय होत आहे. अनेकदा महिला कर्मचाऱ्यांना पुरेशी विश्रांतीही मिळत नाही, त्यामुळे त्यांची मानसिक कुचंबणा होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत तसेच सांगवी पोलीस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र महिला कक्ष, स्वच्छतागृह सुविधेसह उभारणे गरजेचे आहे.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त, ठाणे अंमलदार, वायरलेस, निर्भया पथक, छेडछाड विरोधी पथक अशा विविध जबाबदाऱ्या पेलाव्या लागत आहेत. शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दिवसरात्र काम करावे लागते, अशावेळी महिला पोलिसांची कर्तव्य बजावताना गैरसोय होते. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यात महिलांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष, चेंजिंग रूम, प्रसाधनगृहाची कमतरता आहे. आपत्कालीन स्थितीत मुख्यालयासह परजिल्ह्यांतून, राज्यातून येणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनाही या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या अडचणींचा गांभीर्याने विचार करून पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून ही समस्या सोडविण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी विनंती बहुजन रयत परिषदेतर्फे ऍड. पिल्ले यांनी केली आहे.
