Advertisement
महाविद्यालयीन प्राध्यापक भरती प्रक्रिया गतीमान करण्याबाबत दिले निवेदन
मुंबई : राज्यभरात उच्चशिक्षण विभागात महाविद्यालयांतील रिक्त पदे भरण्याबाबत शासनस्तरावर आदेश आलेले असताना भरती प्रक्रियेला गती नाही. सदर, महाविद्यालयीन प्राध्यापक भरतीची प्रक्रिया गतीमान करण्याबाबत, आपण सूचना कराव्यात अशी विनंती राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक सदस्य तथा माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली.याबाबत राज्यपाल बैस यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात माजी मंत्री ढोबळे यांनी म्हटले आहे की, राज्यभरात उच्च पातळीवर दहा महाविद्यालये असून बारा ज्युनिअर कॉलेज आहेत. अनेक ठिकाणी शासन स्तरावरची परवानगी नसल्यामुळे विद्यापीठ पातळीवरून भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही.
2022 राष्ट्रीय शिक्षणाचे धोरण जाहीर करून देशालाच विद्येच्या वैभवात गतीमान करण्याचे ऐतिहासिक काम देशपातळीवर केंद्र सरकारने हाती घेतले आहे. यासाठी अब्जावधी कोटी रुपये खर्च येणार आहे. यापूर्वीच्या केंद्र सरकारने यासंदर्भातील विषय मागे ठेवला, अशावेळी 34 वर्षानंतर राष्ट्रीय शिक्षणाचे धोरण 2022 मध्ये जाहीर करून केंद्र सरकारने इतिहास घडवला आहे. परंतु, निर्माण भारत व प्राध्यापकांची भरती प्रक्रिया अधिक गतीमान होणे गरजेचे आहे, यासंदर्भातील आदेश संबंधित शिक्षण खात्याला देण्यात यावेत, अशी विनंती माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली आहे. यावेळी युवा नेते अभिजीतदादा ढोबळे, उरूळीकांचनचे भाजप सदस्य राजु ओसवाल, सोलापूर भाजचे सोशल मीडिया प्रभारी संजू खिलारे उपस्थित होते.
