Advertisement
मुंबई : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेना पक्ष आता अधिकृतरित्या शिंदे गटाचा झाला आहे. पक्षाचं चिन्ह आणि नाव हाती येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पक्षाच्या प्रचारासाठी जोरदार हालाचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेच्या प्रचारासाठी नवी रणनिती आखली जात आहे.
शिवसेनेचा प्रचार करण्यासाठी नवी रणनिती काय असावी? हे ठरवण्यासाठी एका सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यात येणार आहे. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांच्याकडे या सल्लागार कंपनीची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. नव्या शिवसेनेच्या प्रचारासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
राज्याच्या सत्ता संघर्षाची सुनावणी अद्यापही सुप्रीम कोर्टात चालू आहे. शिंदे गटासाठी दिलासादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचा निर्णय हा शिंदे गटाच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाकडून पक्षाच्या प्रचारासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत असून, प्रचारासाठी नवी रणनिती आखण्यात येणार आहे.
