Advertisement
आई अनुराधा यांच्याविषयी साश्रू नयनांनी केले मनमोकळे
मोहोळ : माजी आमदार तथा राज्याचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या
कन्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे आपल्या आई अनुराधा यांच्या स्मृतिदिनानिमित्त
अभिवादन करताना म्हणाल्या, वात्सल्य, पावित्र्य आणि मांगल्याचे प्रतीक म्हणजे आई.
माझ्या आईचं स्मरण माझ्यासाठी नेहमीच तिच्यातील संवेदनशीलतेचा आणि प्रेमळपणाचा
अनुभव देणारे आहे.
माझी आई सौ. अनुराधा लक्ष्मण ढोबळे. आज तिचे द्वितीय
पुण्यस्मरण. एक आदर्श पत्नी, गृहिणी, आई, आजी, मैत्रीण, समाजसेविका अशा विविधांगी
भूमिका तिने लीलया पार पाडल्या. तिने कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली; पण, शाहू
परिवाराचा मुख्य आधारस्तंभ बनून तिनं संस्थेतील शेकडो विद्यार्थांना आईच्या मायेनं
जपलं. निरपेक्ष भावनेतून इतरांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या माझ्या आईनं जनसेवेचा
संस्कार नकळतपणे आम्हा भावंडांवरही केला. त्याच संस्काराच्या बळावर मी स्वत:ची ओळख
निर्माण करू शकले. तिचे स्मरण मला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देते. आधार
देते. सकारात्मक ऊर्जा देते.
मला एक गोष्ट आठवते ती अशी की, देवानं एका आईला
प्रश्न विचारला, समजा तुमच्या आयुष्यातून सर्व सुख काढून घेतले आणि विचारलं की
दुसरं काही मागा. तर तुम्ही काय मागणार? त्या आईने उत्तर पटकन उत्तर दिले, माझ्या
बाळाचे नशीब मी माझ्या हाताने लिहिण्याचा अधिकार मागेन! कारण, त्यांच्या चांगल्या
आयुष्यापुढ माझं सुख काहीच नाही, अशी असते आई. आपल्या मुलांच्या उज्ज्वल
भविष्यासाठी झटणारी. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी. म्हणूनच... घर सुटतं पण
आठवण कधी सुटत नाही, जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. आई, तू होतीस, आहेस आणि
कायम राहशील... आमच्या मनात! तुझ्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!
