Advertisement
अनुराधा ढोबळे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी मोहोळसह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील जनसागर लोटला
मोहोळ : माणसाचा जन्म झिजण्यासाठी असतो. त्याला हिऱ्याच्या कोंदणात ठेवून जपायचे नसत. ते जेवढ झिजेल तेवढी त्याला झळाळी येते. सोन्यासारखी चमक येते. मग, त्या माणसाची किंमत आपोआपच वाढत जाते, त्याची कीर्ती सर्वदूर पसरते, अशी माणसे कधीच विस्मृतीत जात नाहीत. आणि आतातर आमच्या मुलांनी "अनुलक्ष' या नावानं ज्ञानाचं मंदिर उभारले आहे. कालौघात आम्ही दोघे विस्मृतीत जाऊ कदाचित, पण "अनुलक्ष' हे नाव मात्र चिरंतन राहील. कारण, ज्ञानमंदिरात पिढ्या घडतात आणि घडलेल्या पिढ्या नवा समाज घडवितात. हेच तिचंही स्वप्न होतं. तिच्या स्मृतींना विनम्र अभिवादन, अशा शब्दांत मोहोळचे माजी आमदार तथा राज्याचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी पत्नी अनुराधा ढोबळे यांना अभिवादन केले.मोहोळचे माजी आमदार तथा राज्याचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथे अभिवादन करण्यासाठी मोहोळसह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील जनसागर लोटला होता. मंगळवार, दि. 4 मे 2021 मध्ये पुणे येथील एका खासगी रुग्णालयात अनुराधा ढोबळे यांचे वयाच्या 58व्या वर्षी निधन झाले होते. माजी मंत्री ढोबळे यांच्या पत्नी म्हणून ओळख असली तरी सावली वुमेन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा म्हणून त्या अखेरपर्यंत कार्यरत असल्याने मोहोळ मतदार संघासह अवघ्या जिल्ह्यात त्यांची अगदी घरटी ओळख होती. अनेक कुटुंबांना त्यांनी सावरले तर अनेकांना अडचणीच्यावेळी मदत केली, याच कारणातून त्यांची अगदी तळागळात ओळख होती. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यास आजच्या स्मृतिदिनी जनसागर लोटला होता.
यावेळी अभिवादन करताना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, माझी पत्नी सौ. अनुराधा लक्ष्मण ढोबळे यांचा आज स्मृतिदिन. स्मृती म्हणजे अनुभवांची आणि जाणिवांची साठवण. 40 वर्षांच्या या साठवणीत असंख्य आठवणी आहेत. सुख-दु:खाचे क्षण आहेत आणि जगणे समृद्ध करणारे अनुभवही आहेत. राजकारणात यायचे असेल तर घरावर तुळशीपत्र ठेवूनच यावे लागते. माझ्या पत्नीने दिलेल्या साथीमुळे! राजकारणात स्थिरावू शकलो. अंगणातली तुळस होऊन तलीने कुटुंब सांभाळले. मुलांना चांगल्या संस्कारात वाढवले. घडवले. मोठं केले. अवघा संसार सुखाचा केला. आज, मुलं मोठी झाली आहेत. आपापल्या संसारात दंग आहेत. असा आनंदमेळा असताना ती अचानक निघून गेली, 40 वर्षांची साथ तुटली. आज, दोन वर्षांनी मागे वळून पाहताना अनेक घटनांचा पट डोळ्यांसमोर उलघडतो. सारं सारं आठवत, अगदी आत्ता घडल्यासारखं! ती सोबत होती म्हणूनच मी समाजकारण, राजकारण, शिक्षण अशा क्षेत्रात काम करू शकलो. तिनं कुटुंब तर सांभाळलंच पण शाहू शिक्षण संस्थेलाही कुटुंबासारखच जपलं. ती गेली अन् दोन्ही कुटुंबं जणू पोरकी झाली.
