Advertisement
माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे प्रतिपादन
मंगळवेढा : विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने शासनाने विद्यार्थिनींसाठी सायकल वाटप योजना सुरू केली आहे. विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी ही योजना प्रेरणादायी ठरणारी आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील श्री बाळकृष्ण विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद मार्फत आयोजित मोफत सायकल वाटप कार्यक्रमात प्रा. ढोबळे बोलत होते. यावेळी मंगळवेढा तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील, माजी उपसरपंच वसंत बंडगर, श्री बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भारत बंडगर, बालविकास अधिकारी जगन्नाथ गारोळे, ग्रामविकास अधिकारी अशोक चव्हाण, वरिष्ठ सहाय्यक माणिक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, बाळकृष्ण विद्यालयाचे चार विद्यार्थी नुकत्याच घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र यादीत आले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान लक्ष्मणराव ढोबळे आणि शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, माजी उपसरपंच राहुल कसबे, ग्रामपंचायत सदस्य तानाजी मोटे, संतोष कांबळे, पोलीस पाटील संजय गरंडे, ज्ञानेश्वर गरंडे आदी उपस्थित होते.
