Advertisement
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ. सुलक्षणा जानकर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सोमनाथ माळी यांच्यात वाद झाला होता. तर दुसऱ्या घटनेत येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरविंद गिराम ग्रामीण रुग्णालयात सातत्याने गैरहजर असतात तसेच येथील रुग्णालयात त्यांचे नियंत्रण नसल्यामुळे अस्वच्छता व रुग्णांना व्यवस्थित सेवा मिळत नसल्याची तक्रार माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्याकडे आल्याने प्रा. ढोबळे यांनी भर चौकात डॉ. गिराम यांच्या कारभाराबाबत डिजिटलद्वारे आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगली होती तसेच याबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली होती.
त्यानुसार झालेल्या कारवाईत या दोन्ही प्रकरणांची चौकशी करण्याकरिता दोन समित्या नेमण्यात आल्या. डॉ. जानकर व माळी यांच्यातील वादाबाबत बाबत माळशिरस चे वैद्यकिय अधिकारी डॉ. काझी व अकलूजचे डॉक्टर गुडे यांची तर डॉ. अरविंद गिराम यांच्या तक्रारीबाबत सिव्हील सर्जन डॉ. डी. के. पाटील व डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्या समितीने चौकशी केली आहे. या समित्यांकडून आपला अहवाल सादर केला जाणार आहे.
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या दोन्ही घटनांबाबत दोन समित्यांनी स्वतंत्र चौकशी केली आहे. त्यांना हवी ती माहिती दिली गेली आहे. तसेच मी शासनाकडून मंजुरी घेवून खाजगी प्रॅक्टिस करीत असून त्यासाठी शासनाच्या काही सुविधा, भत्ते नाकारले आहेत. ड्युटी संपल्यानंतर काय काम करायचे हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे.
- डॉ अरविंद गिराम, वैद्यकिय अधिक्षक, मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय
