Advertisement
नवी दिल्ली, 10 : अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाची आता वेळ जवळ आली आहे. उद्या गुरुवारी सुप्रीम कोर्टामधून निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे सरकार राहणार की जाणार याचा फैसला उद्याच कळणार आहे. 16 आमदार अपात्र ठरणार की पात्र ठरणार याबद्दल निकाल येणार आहे. त्यामुळे उद्या मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे.
राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल उद्या येण्याची शक्यता आहे. 16 मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे हा निकाल कधी लागणार, याकडे आता सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. अखेरीस गुरुवारी हा निकाल लागणार अशी माहिती समोर आली आहे.
आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी करताना सुप्रीम कोर्टासमोर आमदारांनी पक्षविरोधी कारवाया आणि पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन केलं का? नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला असेल तर त्यांना आमदारांना अपात्र करता येईल का? तसंच आता विधानसभा अध्यक्षांची निवड झाली आहे, त्यामुळे नरहरी झिरवळ या आमदारांबाबत निर्णय घेऊ शकतात का? याबाबत कोर्टात जोरदार युक्तिवाद झाला होता. कोर्टाने आतापर्यंत झालेल्या सुनावणीमध्ये राज्यपालांवर कडक ताशेरे ओढले होते.
