Advertisement
विजयसिंह मोहिते पाटील, उदय पाटील, राजेंद्र मिरगाणे, राजकुमार पाटील यांचाही समावेश
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणीवर निवड झालेल्या सदस्यांची यादी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी जाहीर केली. यामध्ये माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, उदय पाटील, राजेंद्र मिरगाणे, राजकुमार पाटील यांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठ वर्षांत भाजपाचे वर्चस्व वाढले आहे. यामध्ये ढोबळे आणि मोहिते यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले जाते.राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या बालेकिल्याला सुरुंग लावून 2019च्या लोकसभा निवडणुकीत दोन खासदार आणि पाच आमदार सोलापूर जिल्ह्याने निवडून दिले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेसह लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे, यामध्ये माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव अग्रस्थानी आहे.
सोलापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पायाभरणी करण्यापासून पक्षाला बळकटी देण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बरोबर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी पायाला भिंगरी लावून काम केले आहे, यातून सोलापुरात पक्ष नावारूपाला आल्यानंतर बाळस धरलेल्या या पक्षाला नवख्या पोरासोरांच्या हाती देण्याची भूमिका मान्य नसल्याने माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी थेट भाजपचे कमळ हाती घेतले, त्यांच्या प्रवेशाने भाजपचा एक अनुभवी तसेच दलीत समाजाचा लोकनेता म्हणून एक विश्वासू चेहरा मिळाला. भाजपने सुरवातीच्या काळात ढोबळे यांच्यावर मोठी जबाबदारी अथवा पद दिले नव्हते, त्यानंतरही ढोबळे यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता सोलापुरात भाजपचे कमळ उमलण्यासाठी आपले सर्व कबस पणाला लावले, ढोबळे यांनी केलेल्या कष्टाचे प्रतिबिंब भाजप पक्षाला लोकसभा, विधानसभ आणि त्यानंतर जि.प., प.सं अगदी साखर कारखाना निवडणुकीतही दिसले. ढोबळे यांच्या या कामाची दखल भाजपने थेट दिल्लीतही घेतली. याच कारणातून गेल्या काही वर्षांत लक्ष्मणराव ढोबळे हे सोलापुरातील भाजपचे नेते म्हणून ओळखले जावू लागले आहेत. एवढेच नव्हे तर दिल्लीसह राज्यातील पहिल्या फळीतील नेत्यांतही ढोबळे यांची उठबस वाढली आहे. ढोबळे यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला आगामी काळातील सर्वच निवडणुकीत होणार आहे, यामुळेच पक्ष प्रदेश कार्यकारिणीवर निवड करताना सोलापुरातून सर्वात पहिल्यांदा त्यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी लक्ष्मणराव ढोबळे हे नाव भाजपच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीतही पहिले नाव आहे.
