#

Advertisement

Thursday, May 25, 2023, May 25, 2023 WIB
Last Updated 2023-05-25T11:43:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूर लोकसभेत पवारांच्या डावपेचासमोर टिकणारे नाव ढोबळेच...

Advertisement

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महामहिम शरद पवार यांनी सोलापूर दौऱ्यात लोकसभेसाठी चाचपणी करताना अनेक धागेदोरे चाचपून पाहिले. आता, यातील कोणता धागा पकडायचा, तो बांधायचा की सोडायचा हे ते ऐनवेळी ठरवणार. पण, यावेळी सोलापूर लोकसभा राष्ट्रवादीकडेच आणायचीच, असा चंग पवार यांनी बांधलेला दिसत आहे. पवारांच्या या "चाली'रितीवर भारतीय जनता पक्ष लक्ष ठेवून असल्याने पवारांच्या तोडीसतोड रिंगणात उतरणारा सोलापुरी पैलवान कोण? हा सवाल ज्यावेळी समोर येत आहे. त्यावेळी माजी मंत्री, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांचे नाव समोर येत आहे. गेली चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात पवार आणि ढोबळे ही नावे समकालीन घेतली जात आहेत. पवार यांच्या राजकीय प्रवासातील अनेक घडामोडींचे साक्षीदार ढोबळे आहेत, त्यामुळे कोणत्या वेळी ते काय निर्णय घेणार, माघार घेणार की पुढं ढकणार याच पक्की जाण प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना आहे. याच कारणामुळे सोलापूर लोकसभेसाठी पवार यांच्या डावपेचासमोर टिकणारे नाव म्हणून ढोबळे यांचेच नाव पुढे येत आहे.
सोलापूर मतदार संघात मागे चार वेळा कॉंग्रेसचा पराभव झालेला आहे. माजीमंत्री स्वर्गीय आनंदराव देवकते, ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे तसेच ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूरच्या जनतेने नाकारले आहे. तर, 2024ची लोकसभा लढणार नसल्याची सुशीलकुमार शिंदे यांनी जाहीर केलेले आहे. खासदार म्हणून दिल्लीत जाण्यास आमदार प्रणिती शिंदे सध्या तरी तयार दिसत नाहीत. शिंदे कुटुंब सोडले तर सोलापुरातून लोकसभा लढण्यास राखीवमधून सक्षम चेहरा सध्या तरी कॉंग्रेसकडे नाही, याच कारणातून ही जागा लढविण्याची तयारी राष्ट्रवादीने केली असल्याचे स्पष्ट होत आहे.

सोलापूर लोकसभा लढविण्याची तयारी राष्ट्रवादीने केली असली तरी यामध्ये महाविकास आघाडीचा धर्म आड येतो की काय? अशीही शक्‍यता आहे. कारण, महाविकास आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. मध्यंतरीच्या राजकीय अडचणीच्या काळात ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीने अर्थातच ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी हात दिला होता. आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीशी झालेया जवळीकीबाबत शरद पवार यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. त्यावेळी पवार आणि आंबेडकर यांच्या जुन्या वादाचा मुद्याही समोर आला होता. परंतु, झालं गेलं गंगेला मिळालं, अशी भूमिका या दोघांनी घेतली होती. परंतु, अशी स्थिती असली तरी ऍड. बाळासाहेब आंबडेकर यांच्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोलापूर लोकसभेची जागा सहजासहज सोडेल असे वाटत नाही. शरद पवार या गोष्टीला तयार होणार नाहीत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी वंचित व एमआयएम यांच्या आघाडीमुळे ऍड. आंबेडकर यांना सोलापुरातून 1 लाख 70 हजार मते मिळाली होती आणि यातून सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव 1 लाख 58 हजार मतांनी झाला होता. परंतु, गेल्या पाच वर्षांत सोलापूर लोकसभा मतदार संघात भाजपची सत्ता असल्याकारणाने 2024 मध्ये मतांची विभागणी होणार हे पक्के आहे. त्यातच महाविकास आघाडीतून ऍड. आंबेडकर यांना उमेदवारी अथवा पाठिंबा देण्यास कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी तेवढे उत्सुक दिसत नाहीत आणि नसतील. यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीकडून सोलापूर लोकसभेसाठी नवखा चेहरा दिला जावू शकतो. तर, ऍड. आंबेडकर यांनी गेल्यावेळी मिळवलेल्या 1 लाख 70 हजार मतांचा खड्डा भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाल तेवढ्या ताकदीचा उमेदवार द्यावा लागेल, यामध्ये माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या नावाचे पारडे सध्या तरी जड वाटत आहे. त्यांच्याकडील शाहू शिक्षण संस्था, दामाजी साखर कारखाना, सूत गिरणी आणि बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून त्यांना असलेला भक्कम पाया यातून प्रा. ढोबळे यांना मतपेरणी सहज शक्‍य आहे. या सगळ्याचा "अभ्यास' भाजपने केलेला आहे तशी तयारीही केली आहे. आता, फक्‍त त्यांनी तयारी दाखवायला हवी.