Advertisement
मंगळवेढा : पंढरपूर विधानसभा
निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्री विठ्ठल सहकारी
साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत दिल्यानंतर भगिरथ
भालके याचं आता काय? अशी चर्चा सुरू झालेली असतानाच राष्ट्रवादी सोडून गेलेले
भारतीय जनता पक्षाचे प्रांतीय सदस्य तथा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि भालके यांचा
एका लग्नसमारंभातील चर्चा करतानाच फोटो व्हायरल झाल्याने आमदार समाधान आवताडे
यांच्याही पोटात भितीचा गोळा आला तर नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा
विधानसभेसाठी 2021 मध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्यात राष्ट्रवादीने भालके यांचे
चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपकडून समाधान आवताडे रिंगणात
उतरले होते. त्यावेळी रिंगणात तब्बल 19 उमेदवार होते परंतु, भालके आणि आवताडे
यांच्यामध्येच लढत होऊन अत्यंत चुरशीच्या या लढतीत आवताडे यांनी बाजी मारली होती.
परंतु, त्यावेळी आवताडे यांच्या विजया बरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर
पडलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी या निवडणुकीसाठी केलेल्या कामाचीच अधिक
चर्चा झाली. आवताडे हे आमदार झाले तरी ढोबळे हे या निवडणुकीत "जायंट किलर' ठरले
होते. त्यांनी भाजपचा झेंडा नाचविल्याची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात झाली होती.
आवताडे यांचा विजय ढोबळे यांच्यामुळे सुकर झाल्याची चर्चा आजही केली जाते.
मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांत आमदार आवताडे हे लक्ष्मणराव ढोबळे गटापासून दूर
गेले असल्याचे सांगितले जाते. तर, ढोबळे यांनीही आवताडे यांचे नाव न घेता अनेक वेळा
आतवाडे यांच्यावर टिका केलेली आहे, त्यातच आता राज्याचे पर्यायाने त्याअनुषंगाने
सोलापूर जिल्ह्याचेही राजकारण बदलू लागले आहे. भाजपने सोलापुरातील केवळ चार जणांना
प्रांतीय सदस्य पदावर घेतले आहे, यामध्ये सर्वात पाहिले नाव हे माजी मंत्री
लक्ष्मणराव ढोबळे यांचे आहे. शिवाय ढोबळे यांची उठबस भाजपच्या राज्य आणि राष्ट्रीय
नेत्यांमध्येही आहे. त्यामुळे ढोबळे यांना डावलून सोलापुरात भाजपमध्ये राहणे म्हणजे
पाण्यात राहून मगरी बरोबर वैर करण्यासारखे आहे. याच कारणातून अन्य पक्षातील नेते
मंडळी, पदाधिकारीही ढोबळे यांच्याशी आता जवळीक साधून आहेत.
या पार्श्वभूमीवर
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाबाबत मोठी घडामोड घडली आहे. दिवंगत भारत भालके
हे सलग तिसऱ्यांदा वेगवेगळ्या पक्षातून आमदार झालेले असताना 2019 मध्ये ते कॉंग्रेस
सोडून भाजपमध्ये येणार असतानाच त्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता,
त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव भगिरथ भालके यांना राष्ट्रवादीने उमेदवारीही
दिली होती. परंतु, त्यावेळी भगिरथ यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे
2024च्या विधानसभेत राष्ट्रवादीकडून पुन्हा भगिरथ भालके यांनाच उमेदवारी दिली
जाणार, असे मानले जात होते. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्री
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत
दिले आहेत. त्यानंतर अवघ्या एका दिवसांत भगिरथ भालके यांचा भाजपचे नेते लक्ष्मणराव
ढोबळे यांच्या बरोबरील फोटो व्हायरल झाला आहे.
लक्ष्मणराव ढोबळे हे ज्या
उमेदवारा बरोबर असतात तो उमेदवार निवडणून येतोच अशी आजपर्यंतची राजकीय परंपरा आहे.
अवताडे, भालके, परिचारक यांनी लक्ष्मणराव ढोबळे यांचे नेतृत्व स्वीकारले होते. तसेच
ढोबळे यांचे उपद्रव्य मूल्यही अनेकांना माहिती आहे. त्यातच आता आमदार समाधान आवताडे
हे ढोबळे यांच्यापासून काहीसे दूर गेले असल्याची चर्चा असतानाच भगिरथ भालके यांनी
ढोबळे यांच्याशी जवळीक वाढविल्याचे व्हायरल झालेल्या फोटोतून तरी दिसत आहे.
लक्ष्मणराव ढोबळे यांनी भालके यांना भाजपमध्ये येण्याचा सल्ला दिला तर अवताडे यांचा
पत्ता कट होण्यास वेळ लागणार नाही, हे सर्वजण जाणतात. त्यामुळे उमेदवारीसाठी भगिरथ
भालके भाजपमध्ये येऊ शकतात, या विचारातूनच आमदार अवताडे यांच्या पोटात भितीचा गोळा
तर आला नसेल ना? अशी चर्चा सध्या व्हायरल फोटोवरून सुरू आहे.
