Advertisement
मुंबई : पूर्वी नोटा बंद झाल्या त्यावेळी लोकांनी खूप काही सहन केले. या नोटबंदीमधून काळा पैसा बाहेर येईल आणि डुप्लिकेट नोटांना आळा बसेल, असे सर्वसामान्यांना वाटलं होते. त्यामुळे त्यांनी ते सहन केले. आता ते शक्य नाही. काल फतवा काढला 2 हजार रुपयांची नोट बंद. काय चाललंय हे? , असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. महिलांनी जपून ठेवलेल्या नोटा आता बँकेत द्या आणि बदलून घ्या, एवढंच राहिलंय, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कान टोचले.
सरकार येतील जातील पण सत्तेचा गैरवापर, मस्ती आणि नशा डोक्यात जाऊ देऊ नका, असा इशारा दिला. मंदिराला ड्रेस कोड लागू करण्याच्या निर्णयावरुन सरकारचे कान टोचले आहेत. 'हाफ पँट घालून दर्शनाला गेल्यास बिघडलं काय?', 'कोणत्या रस्त्याने महाराष्ट्राला घेऊन जाताय?... महागाई, बेरोजगारीवरचं लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न दिसून येत आहे. काही देवस्थानांनी कमी कपडे घालून मंदिरात यायचं नाही असं सांगितलं. अनेक ठिकाणी पोशाखच तसा आहे, त्याला काय करणार ? कोणी गोमूत्र शिपडतंय कोणी काय करत आहे. कोणत्या मार्गाने तुम्ही महाराष्ट्राला घेऊन जाताय. मंदिरा प्रमाणे दर्ग्यातही आपण जातो, असे अजित पवार म्हणाले.
