Advertisement
पाटणा : बिहारची राजधानी पाटणा इथं 23 जून रोजी विरोधी पक्षांच्या नेत्यांची सर्वात मोठी बैठक होणार आहे. या बैठकीत जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पार्टी तसंच इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. मोदी सरकारच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन उद्या पाटण्याच्या मंचावरून राजकीय घोषणाबाजी करतील. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी एकजुटीचा हा ट्रेलर असेल, असे मानले जात आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी एकता अभियानाची धुरा सांभाळली आहे. शुक्रवारी होणाऱ्या या बैठकीत भाजपला सत्तेतून बेदखल करण्याच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते पाटण्याला पोहोचले आहेत.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, जेडीयू, आरजेडी, हेमंत सोरेन, मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला. याशिवाय सीपीआय, सीपीएम आणि डीएमकेचे नेतेही यात सहभागी होण्यासाठी येत आहेत.
सभेच्या कार्यक्रमाबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. ही चर्चा दुपारी 4 वाजेपर्यंत चालणार आहे. दरम्यान, सर्व राजकीय दिग्गज मंडळी एकत्र जेवण करणार आहेत.
