Advertisement
अयोध्या : रामभक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या क्षणाची तारीख जाहीर झाली आहे. बहुप्रतीक्षित राममंदिरात रामलल्ला 22 जानेवारी 2024 रोजी विराजमान होणार आहेत. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रभू रामाच्या राज्याभिषेकाच्या आठवडाभरापूर्वी देशभरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. म्हणजेच मकर संक्रांतीपासूनच संपूर्ण देशात या महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे.
देशातील वैदिक विद्वान या महोत्सवात पूजा करतील. 22 जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलल्ला यांना भव्य मंदिरात विराजमान करतील आणि 23 जानेवारीला प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचा समारोप होईल. त्यादरम्यान देशभरातील रामभक्तांना प्रसादाचं वाटप केलं जाईल. त्यानंतर 24 जानेवारी 2024 पासून जगभरातील रामभक्तांना भव्य मंदिरात आपल्या दर्शन घेता येणार आहे.
