Advertisement
कोल्हापूर : कोल्हापुरातील तणावाची परिस्थिती लक्षात घेता पुढचे 31 तास इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृह विभागाच्या सचिवांनी इंटरनेट बंद करायला परवानगी दिली आहे, यामुळे 8 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.
कोल्हापुरमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीवर गृहखात्याने पोलिसांना आदेश दिले असून चुकीचं वागणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. तसंच कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी असंही आवाहन करण्यात आलं आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्याला महाराष्ट्रात माफी नाही. जनतेने शांतता पाळावी असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. कोल्हापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमारही केला. तसंच जिल्ह्यात 19 जूनपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पाच किंवा त्याहून जास्त लोकांना एकत्र जमा होण्यास बंदी असणार आहे. याशिवाय जमाव जमवणे, मिरवणुका काढणे, सभा, प्रतिमांचे प्रदर्शन, आवेशपूर्ण भाषणे करण्यासही मनाई असणार आहे.
