Advertisement
सोलापूर : सोलापुरच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेले नाव म्हणजे ऍड.
कोमलताई साळुंखे-ढोबळे. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या असलेल्या ऍड.
कोमलताई यांचे नाव सोलापूर लोकसभा आणि मोहोळ विधानसभेसाठी प्रामुख्याने घेतले जात
असताना त्याच "भावी आमदार' म्हणूनही अनेकांनी शिक्का मोर्तब केले आहे. ऍड. कोमलताई
या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असतील, अशी चर्चा असताना ऍड. कोमलताई
साळुंखे-ढोबळे यांना आता राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांसह अन्य राज्यातील
पक्षांकडून त्यांच्या चिन्हावर सोलापुरात निवडणूक लढविण्याच्या "ऑफर' येवू लागल्या
आहेत. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीकडून (बसप) ऍड. कोमलताई यांना थेट सोलापूर
लोकसभेच्या तिकीटाची ऑफर आहे. ऍड. कोमलताई यांचे वडील माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे
हे भाजपचे नेते आहेत. त्यामुळे त्या बसपची उमेदवारी स्विकारणार का? अशी चर्चा
असतानाच आता ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांना आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के.
चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीकडूनही (बीआरएस) निवडणुकीची ऑफर आली आहे.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे "कर्नाटक कनेक्शन' चांगले आहे. त्यामुळे ऍड.
कोमलताई यांनी राज्याबाहेरील अशा कोणत्या पक्षाचे उमेदवारी स्विकारली तर त्या
सोलापुरातून आव्हान निर्माण करू शकतात.
मोहोळ तालुक्यावर पकड असलेले भाजपचे
नेते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या ऍड. कोमलताई यांनी गेल्या काही
वर्षांत बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून स्वत:चे स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण
केले आहे. वडील लक्ष्मणराव ढोबळे हे भाजपचे नेते असले तरी ऍड. कोमलताई यांनी बहुजन
रयत परिषदेचे कार्य जोमाने सुरू ठेवले आहे. "भाजप आमची आणि आम्ही भाजपचे', अशा
भूमिकेतून लक्ष्मणराव ढोबळे आणि ऍड. कोमलताई कार्यरत असल्या तरी बहुजन रयत
परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समाज बांधवांसाठी मोठे कार्य केले आहे
किंबहुना याच परिषदेद्वारे त्यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांची भक्कम फळी तयार
केली आहे. राज्यातील कानाकोपऱ्यासह सोलापुरात बहुजन रयत परिषदेची स्वत:ची ताकद आहे.
त्यामुळे राज्यातील कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढविणे हे माजी मंत्री
लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह ऍड. कोमलताई यांना सोपे जावू शकते विशेष म्हणजे
लक्ष्मणराव ढोबळे आणि ऍड. कोमलताई साळुंखे यांच्याकडे भाजपसह अन्य राजकीय पक्षही
"विनींग सिट'चे उमेदवार म्हणून पाहत आहेत. त्यातच आता या ऍड. कोमलताई यांना बसप
तसेच भारत राष्ट्र समितीकडूनही उमेदवारीची ऑफर आली आहे. परंतु, भाजप त्यांच्याबाबत
काय भूमिका घेणार यावर त्यांचा पुढील निर्णय अवलंबून असणार आहे. त्यामुळेच आम्ही
भाजपचेच...म्हणणारे ऐन निवडणुकीच्या वेळी कोणत्या पक्षात जाणार यावर सोलापुरातील
निवडणुकांचे निकाल ठरतील.
