#

Advertisement

Wednesday, June 14, 2023, June 14, 2023 WIB
Last Updated 2023-06-14T11:24:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

क्रिकेटच्या लिलावाप्रमाणे शेतमालाचेही लिलाव घ्यावेत : ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे

Advertisement

मंगळवेढा : राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी वेळ नाही, शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत अडकला आहे. तिकडे मात्र क्रिकेटच्या लिलावात एखाद्या खेळाडूसाठी करोडोची बोली लावली जाते. शेतकऱ्यांच्या शेतमालाचेही असेच लिलाव करता येणार नाहीत का? निदान त्या लिलावात चार पैसे शेतकऱ्यांना अधिकचे मिळतील, असा शालजोडा बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी लगावला आहे.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेतील पारितोषिक वितरण प्रसंगी ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे बोलत होत्या. क्रिकेट स्पर्धेत फायटर क्‍लब नंदेश्वर, डीसीसी डोंगरगाव आणि मारापुर या संघाला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, पोलीस निरीक्षक रणजित माने, मुख्याध्यापक कांतीलाल इरकर, बापूसाहेब मेटकरी, संजय मस्के, कविराज दत्तू, सुभाष मस्के, संगमेश्वर मस्के, विलास पाराध्ये, वाल्मिकी लोखंडे, तुकाराम मस्के, विकास अवघडे, प्रवीण साठे, ब्रह्मदेव वाघमारे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, हजारो रूपये खर्चून उत्तर महाराष्ट्र,कोकण,पश्चिम महाराष्ट्रात घेतलेली पिके, फळ बागा या गारपीट व अवकाळीने उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. तेव्हा शेतकऱ्याला आधाराची आणि शासकीय मदतीची गरज होती, शासकीय मदत देवून त्याचे अश्रु पुसण्याची गरज असताना राजकीय उखाळ्या पाकाळ्या काढण्यात लोकप्रतिनिधी धन्यता मानतात याची खंत वाटते.
आदीच्या नुकसान भरपाईची मदत सरकारी नियम व फायली प्रवासात कागदावर अडकून पडली आहे. यातून शेतकऱ्यालाच कुणी वाली नसल्याचे स्पष्ट होते. निसर्गाकडून होणारा अन्याय, शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी पिचलेला असता तिकडे क्रिकेटच्या लिलावात मात्र करोडोची बोली लावली जाते असेच लिलाव शेतकऱ्यांच्या पिकांचेही घ्यावेत, त्या लिलावात चार पैसे अधिकचे मिळतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे म्हणाले की, पुस्तक उशाला ठेवून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होता येत नाही त्या प्रमाणे बॅट उशाला ठेवून चांगले क्रिकेटरही होता येत नाही, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, तरच यशस्वी होता येते. यावेळी पोलीस निरीक्षक रणजीत माने, बापूसाहेब मेटकरी व कविराज दत्तू यांनीही मनोगत व्यक्‍त केले.