Advertisement
सोलापूर : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री व भारतीय राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे संस्थापक के. चंद्रशेखर राव यांचे सोलापूर मतदार संघात बहुजन रयत परिषद महिला आघाडी प्रमुख ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी स्वागत केले. यावेळी राव यांच्याशी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेसाठी तेलंगणाला येण्याचे आमंत्रण के. चंद्रशेखर राव यांनी ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांना दिले आहे. के.राव आणि ॲड. कोमलताई यांची ही भेट सोलापूरच्या राजकारणाला महत्वपूर्ण वळण देणारी ठरली आहे.
भारतीय राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे संस्थापक के. चंद्रशेखर राव हे पंढरपूरी विठ्ठल दर्शनासाठी आले आहेत. यावेळी सदर भेट झाली, विशेष म्हणजे राव यांनी ॲड. कोमलताई यांची स्वतंत्रपणे चर्चा केली. ॲड. कोमलताई या भाजपचे नेते, माजी मंत्री लक्षमणराव ढोबळे यांच्या कन्या आहेत. सामान्यपणे इतर वेळी लक्षमणराव ढोबळे यांच्या सोबतच ॲड. कोमलताई असतात, यावेळी के. चंद्रशेखर राव यांचे स्वागत करताना ते उपस्थित नव्हते, त्यामुळेही वेगळ्या चर्चेच्या वावड्या सोलापूर राजकारणात उडाल्या आहेत.
ॲड. कोमलताई ढोबळे यांना बीआरएसकडून सोलापूर लोकसभा उमेदवारीची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे संभाव्य २०२४ची लोकसभा किंवा विधानसभा ते बीआरएसकडून लढवू शकतात.
आज, झालेल्या के. राव आणि ॲड. कोमलताई ढोबळे यांच्या भेटीनंतर सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवण्याचे बीआरएसने निश्चित केले असल्याचेच मानले जात आहे.
या राखीव जागेसाठी आक्रमक आणि जनमानसामध्ये ओळख असलेला चेहरा अॅड. कोमलताई साळुंखे यांच्या रुपात देऊन बीआरएस कडून भाजपला राजकीय शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
सोलापूर शहरात हैदराबाद तेलंगणा भागातील असणारा मतदार, पंढरपूर-मंगळवेढा भागात ढोबळेंचा असलेला जनसंपर्क, शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असलेले जाळे, बहुजन परिषदेतील कार्य या अॅड. कोमलताई यांच्या गोष्टीकडे भाजपला दुर्लक्ष करून चालणार नाही. याच कारणामुळे के. राव आणि अॅड. कोमलताई यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. याबाबत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे.
