Advertisement
| सोलापूर : महाराष्ट्रात सध्या मंदिरातील ड्रेस कोडचा मुद्दा चर्चेत असताना
धार्मिक स्थळांचा सर्वांगिण विकास, मंदिर परिसरातील नद्यांचे प्रदूषण, मंदिराभोवती
वाढलेला अतिक्रमणांचा विळखा, भाविकांची होणारी लूट, महिला तसेच दिव्यांग
भाविकांसाठीच्या असुविधा अशा मुद्यांवर ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी बोट ठेवले
असून पंढरपूरच्या धर्तीवर तुळजापूर, अक्कलकोट या मंदिरांचाही विकास आराखडा तयार
करावा याबाबतचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांना देणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यातील मंदिरात ड्रेस कोडचा मुद्दा चर्चेत आहे, त्यातुलनेत मंदिरांच्या इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी आपले विचार मांडले, त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर मंदिर ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. मात्र, भाविकांचा विरोध असल्यामुळे हा निर्णय एका दिवसात मागे घेण्यात आला. परंतु, हे प्रकरण राज्यात चांगलंच चर्चेत आले. पुण्यातील वाघेश्वर मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. नागपूर आणि जळगावातील मंदिरातही ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. साडेतीन शक्तीपीठपैकी एक असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिरात देखील ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय विश्वस्तांच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील श्री गोपाळ कृष्ण मंदिर गोरक्षण सभा (धंतोली), श्री दुर्गा माता मंदिर (हिल टॉप), हनुमान मंदिर (बेलोरी) आणि श्री बृहस्पति मंदिर (कानोलीबारा) या मंदिरामध्ये ड्रेस कोडची सक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे, अशा पद्धतीने राज्यभरात सध्या मंदिरातील ड्रेसकोड बाबतचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. विशेष म्हणजे याबाबत अनेक राजकीय, सनातनी प्रतिक्रिया उमटत आहेत. ड्रेस कोड हा मुद्दा योग्य की अयोग्य याबाबत काही बोलण्यापेक्षा मला मंदिरांविषयीचे काही प्रश्न प्रकर्षाने जाणवले आहेत. विशेषतः महिला भाविकांविषयीचे प्रश्न अधिक प्रमाणात समोर आले. आपल्या सोलापूर जिल्ह्यातील मंदिरांतच अशा गैरसोयी असल्याबाबत खंत वाटते. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष, विशेषतः ज्येष्ठ महिला आणि दिव्यांग महिलांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था, दर्शन घेत असताना मंदिरतील पुरुष कर्मचाऱ्यांकडून होणारी ढकलाढकली, गाभाऱ्यात नमस्कार करत असताना भाविकांना खेचून बाहेर काढणे, असे प्रकार सर्रास चालले आहेत. महिला भाविकांच्या सुरक्षतेसाठी महिला पोलिसांची संख्या अतिशय कमी आहे. महिलांसाठी तक्रार निवारण केंद्र कोठेही नाही. महिला भाविकांशी असभ्य वर्तन हे तर सर्वत्रच दिसते किंबहुना काही ठिकाणीही पुरुषी मक्तेदारी झाली आहे. याशिवाय मंदिराभोवती वाढलेली अतिक्रमण, दुकानदारांत एकमेकांत होणारी भांडण, हार-नारळ विक्रीची वाढलेली स्पर्धा यातून भाविकांच्या भावनांचा मांडलेला बाजार, भाविकांनी काही खरेदी केली नाही तर त्यांना होणारी शिवीगाळ, मारामारी असे चित्र सर्रास पहायच मिळत आहे. मंदिर परिसरातील पार्किंग व्यवस्था त्याची बोकाळलेली ठेकदारी असे कितीतरी प्रश्न समोर येत आहेत. हे प्रश्न सोडविण्याऐवजी ड्रेस कोडचा मुद्या चर्चेत आहे. पंढरपूर विठ्ठल मंदिराचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु, राज्यभरातील मंदिरांचा खरोखरच विकास व्हावा, असे वाटत असेल तर नमूद केलेल्या समस्या सुटायला हव्यात. मंदिर आणि तेथील व्यवस्थापन कसे असावे हे दक्षिणेकडील मंदिरांच्याबाबतचे उदाहरण आपल्याला घेता येईल. त्यांच्याकडे अद्याप तरी मंदिरांचा बाजार झालेला नाही, या बाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला आयोग यांना निवेदन देणार आहे. | |||
