Advertisement
गोपीनाथ गड : भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज आहेत. भाजप सोबत असलेल्या नाराजीविरोधात पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन कार्यकर्त्यांना संबोधीत केले. मी कधी कुणा समोर झुकणार नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी रोखठोक भूमिका मांडली. यानंतर पंकजा मुंडे स्वत:चा पक्ष काढणार अशी चर्चा रंगली आहे.
पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे सध्या भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांची राजकीय कारकिर्द अडचणीत आली आहे. भाजप पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याची देखील चर्चा आहे. भाजपनं पंकजा मुंडेंना कुठलीही मोठी जबाबदारी दिलेली नाही. तसेच पंकजा यांचे राजकीय पुनर्वसनही करण्यासाठी पक्षाने कोणतेही प्रयत्न देखील केलेले नाहीत.
पंकजा मुंडे यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. गोपीनाथ गडावर मुंडेंना श्रद्धांजली अर्पण करताना पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली. माझे नेते अमित शाह आहेत. लवकरच मी अमित शाह यांची भेट घेणार आहे. त्यांच्याशी मनमोकळेपणानं बोलणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. जेव्हा भूमिका घ्यायची असेल तेव्हा सगळ्यांना बोलावून सगळ्यांच्या समोर बिनधास्त भूमिका घेणार, अस पंकजा मुंडे म्हणाल्या. गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांचे भाषण सुरु असताना एका कार्यकर्त्याने त्यांच्याकडे स्वत:चा पक्ष काढा अशी मागणी केली. आम्ही तन मन लावून पक्षासाठी काम करु. गरज पडल्यास स्वत:चे रक्त देऊ असे देखील हा कार्यकर्ता म्हणाले.
