Advertisement
बारामती: महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? हे लोण आता बारामतीमध्येही पोहोचलं आहे. शरद पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादी नाही तर थेट काँग्रेसकडून बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. बारामती शहर काँग्रेस भवन कार्यालयाच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्ते रोहित बनकर यांनी नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत हे बॅनर लावले आहेत. याआधी भंडारा आणि नागपूरमध्येही नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लागले होते.
अजित पवार, सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करणारी पोस्टर मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयासमोर लावण्यात आली होती, तर जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनीही मुंबईत असेच पोस्टर लावले होते. नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनीही देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री करत पोस्टरबाजी केली होती.
