Advertisement
| सोलापूर :
जिल्ह्याच्या विकासावर विमानसेवेअभावी निश्चितच मर्यादा आल्या आहेत. केंद्राकडून
2014 मध्ये "उडान' योजने अंतर्गत समावेश करण्यात आलेल्या सोलापूर विमानतळ प्रकल्प
पूर्ण करण्याची मुतद मार्च 2023 पर्यंतची होती ती आता संपली आहे. परंतु, विमानतळाचे
काम कुठल्याच पातळीवर पूर्ण झालेली नाही, एकूणच काय तर सोलापूरच्या विकासासाठी
पुन्हा ताकदीचा लोकप्रतिनिधीच नसल्याच्या बाबीकडे लक्ष वेधले जात असल्याचे बहुजन
रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्ह्यात प्रशासकीय कामकाजाच्या पार्श्वभूमीवर ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी सोलापूर विमानतळाच्या मुद्यावरील प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, सोलापूरच्या विकासासात दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधांचा मोठा अडथळा असल्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी वेळोवेळी सूचित केले आहे. हाच मुद्दा मी ही अनेक व्यासपिठावर मांडला आहे. सोलापुरातून विमान उड्डाण झाले तरच सोलापूर विकासाच्या दिशेने झेपावेल; अन्यथा सोलापूरचा विकास होणार नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. शेजारच्या कलबुर्गीहून विमानांचे उड्डाण सुरू झाले आहे. विजयपूरचे कामही अंतिम टप्प्यात आहे, अशावेळी आपल्या सोलापूरचे विमानतळाचे काम का झाले नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता, तर जनताही या मुद्यावरील आश्वासनांना कंटाळली आहे. "उडान' योजने अंतर्गत असलेल्या या प्रकल्पाची मुदतही मार्च 2023 मध्ये संपली आहे. त्यामुळे आता, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून केंद्राकडे पुनर्विचार प्रस्ताव पाठविण्यात येणार का? सोलापूरसाठी विमानतळ मंजूर असताना पुन्हा नव्याने जागा पाहावी लागणार का? पुन्हा भूसंपादन करावे लागणार का? हे सारे प्रश्न उपस्थित होऊ शकतील. सध्या, तरी सोलापूर प्रवाशांबरोबरच विविध औद्योगिक तसेच कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी विमानसेवेची मोठी गरज आहे. ती नव्या विमानतळाशिवाय अशक्य असल्याचे ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले. | |||
