Advertisement
मुंबई : शिंदे-भाजपा सरकारसंदर्भातील सर्वेक्षणानंतर मंगळवारी छापण्यात आलेल्या सरकारी जाहिरातीवरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या जाहिरातीमध्ये राज्यात एकनाथ शिंदे आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी असा संदेश देण्याचा प्रयत्न शिंदे गटाच्या माध्यमातून करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या जाहिरातीलमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नसल्याच्या मुद्द्यावरुनही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आणि राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे गटाला लक्ष्य केलं. या जाहिरातीमध्ये शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळत असल्याचा संदेश जात असल्याच्या मुद्द्यावरुन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. या जाहिरातीवरुन कुरघोडीचं राजकारण सुरु असतानाच भाजपाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट बेडकाची उपमा दिली आहे. जाहिरात प्रकरणावर बोलताना बोंडेंनी शिंदेसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही : अनिल बोंडे यांनी या जाहिरातीसंदर्भात बोलताना, बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होता येत नाही. शिंदेंना ठाणे म्हणजे महाराष्ट्र वाटू लागला आहे, अशी विधानं केली आहेत. "बेडूक कितीही फुगला तरी हत्ती थोडी बननणार आहे. एकनाथजी शिंदे आदरणीय मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पार्टी, जनतेनं त्यांना स्वीकारलं आहे. पण त्यांचे सल्लागार चुकीचे सल्ले देत असतील. कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही. उद्धवजी ठाकरेंना वाटत होतं की मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आहे. आता एकनाथजी शिंदेंना वाटायला लागलं आहे की ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आहे," असं बोंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
