Advertisement
छत्रपती संभाजीनगर : देशातल्या सर्वसामान्य व्यक्तीवर मला विश्वास आहे. राजकारणी चुकले की ते मार्ग दाखवतात. इंदिरा गांधींसारख्या जबरदस्त नेत्यांचा पराभव जनतेने केला, ज्याच्या हातात सत्ता दिली, त्यावेळी जबाबदारी पाळली नाही म्हणून मोरारजी देसाई यांची सत्ता गेली. लोक शहाणपणाचे निर्णय घेतात,' असं विधान शरद पवारांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या भाषणामध्ये शरद पवारांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. सोबतच त्यांनी विरोधी पक्षांनाही पुढचा धोका सांगितला आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरूनही शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवीन वास्तूची गरज काय? हा प्रश्न आहे. नवीन वास्तू झाली, राष्ट्रपतींना बोलावण्याची मागणी केली, मात्र ती मान्य झाली नाही, म्हणून आम्ही गेलो नाही. टीव्हीवर आम्ही कार्यक्रम पाहिला, जेव्हा आधीच्या संसदेचं उद्घाटन झालं त्यावेळी सर्व मंत्र्यांचा फोटो काढण्यात आला, आताचा फोटो बघा, साधू संतांचा फोटो पाहायला मिळाला. राष्ट्रपती सोडा, उपराष्ट्रपतीदेखील दिसले नाहीत, सभागृहाचे प्रमुख ते आहेत. प्रश्न विचारला उत्तर मिळालं नाही, माहिती घेतली तर उद्घाटनात त्यांना महत्त्व मिळालं असतं, पंतप्रधानांना कमी महत्त्व मिळालं असतं. सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला. संसदेचं महत्त्व आम्ही ठेवले नाही, तर सर्वसामान्यांना आस्था कशी राहिल? संसदेकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे? हे कळतं आणि ते चांगलं नाही,' अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
