Advertisement
पंढरपूर येथे विवेक वर्धीनीचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांच्या सेवानिवृत्ती समारंभ
सुनिल अडगळे
पंढरपूर : शिक्षक हाच खरा राष्ट्राचा उद्धारक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
पंढरपूर येथे विवेक वर्धीनीचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांच्या सेवानिवृत्ती समारंभाच्या निमित्ताने आयोजित समरंभात लक्ष्मणराव ढोबळे बोलत होते
यावेळी त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा विविध विषयांवर बहुमोल आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून त्यांनी सभागृहातील सर्व श्रोत्यांना अक्षरशः खिळवून ठेवले. पाराध्ये सरांचा संपूर्ण जीवनपट आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून त्यांनी संप्तरंगी चित्रपटासारखा उलगडून दाखवला.
वक्तृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व हे शब्द बोलणे आणि अशी संबोधने आपल्या भाषणाच्या माध्यमातून एखाद्याला देणे खूप सोपे असते , परंतु त्याला आपल्या अंगभूत कौशल्याच्या आधारे सिद्ध करून दाखवणारे, आणि झोपडीत जन्माला येऊन गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ रसिक श्रोत्यांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणारे महाराष्ट्रातील एकमेव-द्वितीय नेते म्हणजे लक्ष्मणराव ढोबळे साहेब हे एकमेव असल्याचे या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांनी अनुभवले.
व्यासंगाला जेव्हा अनुभवाची जोड लाभते,तेव्हा ज्ञानदेवाच्या ज्ञानेश्वरीतील गोडवा जसा ओवी ओवी मधून पाझरतो,अक्षरशः तसाच अमृतमय गोडवा..'ज्यांच्या जिभेवर सरस्वती आहे,'असे अभिमानाने म्हटले जाते त्या "शब्दप्रभू" ढोबळे साहेबांच्या शब्दांशब्दातून सर्व बालवृद्धांनी 'याची देही याची डोळा' आज अनुभवला, अशीच प्रतिक्रीया या कार्यक्रमानंतर अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.
यावेळी पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष माने सर,श्री. दादासाहेब सौंदळे शिक्षण संस्थेचे सचिव आप्पासाहेब चोपडे, अखिल भारतीय बिल्डर असोसिएशनचे राज्याध्यक्ष दत्तात्रेयमामा मुळे, चित्रपट अभिनेते राहुल पद्मिनी नवनाथ राजे आदी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
सेवानिवृत्ती समारंभ सोहळ्याचे काटेकोर नियोजन विस्तार अधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे साहेब यांनी केले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सर्व सदस्य आणि आजी-माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
