#

Advertisement

Monday, July 10, 2023, July 10, 2023 WIB
Last Updated 2023-07-10T11:44:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

प्राध्यापक ढोबळे यांच्या "शाहू संस्थे'चा आज 43वा वर्धापन

Advertisement

भीमराव मोरे
सोलापूर : आत्मसन्मान जागृती व प्रशासनात सहभागासाठी संघर्ष करा. डॉ. बाबासाहेबांच्या उपेक्षितांच्या उद्धारासाठी ही त्रिसूत्री बहुजनांनी आपल्या जीवनात अंगीकारावी म्हणून ज्या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी एका लंगोटी घातलेल्या दलिताच्या पोराला वसतिगृहात सोडले, बाबासाहेबांच्या घटनेमुळेच वर्गात बसून शिकता आले. तोच दलितांचा पोरगा पुढे शिक्षण संस्काराने उच्च विभूषित झाला. तो तेथेच थांबला नाही तर दलितांची, बहुजनांची पोरं आपल्या सारखीच शिक्षित झाली पहिजेत, ज्ञान वाटले गेले पाहिजे या विचारातून स्वत: शिक्षण संस्थेचे रोपटे लावले. त्या दलित आणि उच विद्याविभूषित असलेल्या शिक्षणप्रेमीचे नाव प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे! त्यांनी सुरू केलेल्या शाहू संस्थेचा आज 43वा वर्धापन दिन संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिक्षण संकुलामध्ये साजरा होत आहे.


दलित आणि बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षण घेण्याचा हक्क आहे, असे सांगणारे राजश्री शाहू महाराज त्यांचे आणि प्रा. ढोबळे यांचे विचार एकाच धाग्यातील. सत्तेचा आणि संपत्तीचा त्याग करावा लागला तरी बहुजनांची मुले शिकली पाहिजेत हा शिक्षणाचा मंत्र देणाऱ्या राजश्री शाहू महाराज यांच्या नावाने 10 जुलै 1978 साली भगवंताची वैकुंठ भूमी समजल्या जाणाऱ्या पंढरपूर येथे शाहू शिक्षण संस्था या नावाने शिक्षण संस्थेची स्थापना झाली. चंद्रभागेच्या काठावर गंगा स्नानाला आसुसलेल्या वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची व दर्शनाची उत्कंठा लाभावी तसेच महाराष्ट्रातील विचारवंत, गरजवंत, दलितांची पोर महाराष्ट्रातील या दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या शाहू शिक्षण संस्थेकडे ओढली जाऊ लागली आणि 40 वर्षाच्या शिक्षण संस्थेच्या प्रवाहामध्ये लाखो बहुजनांची मुले शाहू शिक्षण संस्थेमध्ये ज्ञान आणि सुसंस्कार आने प्रज्ञावंत झाली.


स्वर्गीय औदुंबर अण्णांच्या आशिर्वादाने पंढरीच्या अंगणात लावलेला हा ज्ञानाचा औदुंबर वाढत गेला त्याच्या फांद्या आणि कर्तृत्वाची उंची आज गगनाला गवसणी घालते आहे. दीपकाला दिपवून टाकणारे सामर्थ्य बहुजनांच्या पोरांमध्ये याच, दुनियेच्या बाजारात ज्ञानाचा चमत्कार घडावा, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांपासून नाठाळाच्या माती काठी मारणाऱ्या तुकारामांपर्यंत आणि मातीतील कुरपन करणाऱ्याअलौकिक प्रतिभेच्या बहिणाबाई, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. या वात्सल्याच्या ग्वाही सांगणाऱ्या माऊली पासून ते प्रपंच नेटका करावा म्हणणाऱ्या रामदासांपर्यंत सामाजिक परिवर्तन दुबळ्यांना कळावे यासाठी सामाजिक प्रबोधनाची अपेक्षा करून प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी शाहू शिक्षण संस्था उभी केली.


प्राध्यापक ढोबळे सर खेड्यातून आल्यामुळे ग्रामीण विद्यार्थांचे शहरात शिक्षण घेताना हाल होऊ नयेत म्हणून प्रथम त्यांनी पंढरपूरची निवड केली. शहरात यशवंतराव चव्हाण विद्यार्थी वसतिगृह व दलित वाचनालयाची स्थापना केली. भंगार खरेदी विक्री, सायकल भाड्याने देणे, झुणका भाकर विकून, गवंड्याच्या हाताखाली काम करून स्वत:च्या घरावर स्लॅब टाकण्यापेक्षा वसतिगृहावर आयुष्यातील पहिला स्लॅब टाकला आणि पंढरपुरात शाहू शिक्षण संस्थेची पहिली इमारत उभी राहिली हीच इमारत आज औदुंबर पाटील विधी महाविद्यालय नावाने सुरू आहे.

स्वातंत्र्याच्या 50 वर्षांपूर्वी आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये दलित समाज व बहुजन समाजाच्या जडणघडणीमध्ये व सामाजिक न्याय हक्कासाठी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील अशा शिक्षण व समाज सुधारकांनी समाज जागृतीची ज्योत पेटवून सामाजिक क्रांती घडविली. त्याच क्रांतीची ज्योत संपूर्ण महाराष्ट्रभर तेवत ठेवण्याचे सामर्थ्य आपल्या मंगळवेढ्याचे प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या रूपाने लाभले. याचा आम्हा मंगळवेढेकरांना सार्थ अभिमान वाटतो. याच समाज प्रबोधन विचाराने ध्येयवेड्या झालेल्या ढोबळे सरांनी शाहू शिक्षण संस्थेतील शिक्षण क्षेत्रातील योगदान हे कर्मवीर अण्णांच्या विचारांचेच आहे.

या संस्थेच्या माध्यमातून 13 पूर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, 18 माध्यमिक विद्यालय 5 आश्रम शाळा, 10 कनिष्ठ महाविद्यालय, 7 अध्यापक महाविद्यालय, 7 वरिष्ठ महाविद्यालय 17 वसतिगृहे, 6 विधी विद्यालय असे महाराष्ट्रातल्या 30 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यात 116 संस्थांच्या व शिक्षण संकुलांच्या माध्यमातून 70,000 हून अनेक विद्यार्थी शिक्षणाने परिपूर्ण होत आहेत. याच शिक्षण संस्थेमध्ये डॉक्‍टर, वकील, प्राध्यापक व अनेक जण महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणामध्ये आपले अस्तित्व केवळ 27व्या वर्षी आमदार झालेले प्रा. लक्ष्मणराव ढोबळे 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत 11 वर्षे सत्तेतील भागीदार आणि मंत्री म्हणून वावरले. त्यांनी केलेल्या कार्यामुळेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील तरुण वर्ग समाजकारण व राजकारणाचा देवदूत म्हणून लक्ष्मणराव ढोबळे सर यांच्याकडे पाहू लागला. याच शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मंगळवेढेकर यांचे ऋण फेडण्यासाठी ढोबळे सरांनी कवी संमेलन, माहेर मेळावा, सामुदायिक विवाह सोहळा, बाबासाहेब सातारकर प्रवचन, जनजागृती अभियान, व्यसनमुक्‍ती अभियान उजनी पाण्यासाठी उपोषण, शेतकरी मेळावे आशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या मनात कार्यमस्वरूपी राहिले आहेत. ढोबळे सरांच्या विचारांचा हाच वारसा घेऊन असंख्य कार्यकर्ते कार्यरत आहेत. अलीकडे राजकारणापेक्षा समाजकारण आणि शिक्षण यामध्येच ढोबळे सर व्यस्त आहेत. त्यातही त्यांनी शाहू शिक्षण संस्थेच्या ज्ञानाची ज्योत महाराष्ट्रभर तेवत ठेवली आहे. या शिक्षण संस्थेला आज 43 वर्षे पूर्ण होत असताना आगामी काळात शाहू या नावाची ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर परिवर्तनाची लाट निर्माण करेल यात शंका.
- लेखक मो. 9890111227