Advertisement
| सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन
मंगळवेढा येथे होणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या
आठवड्यात हे संमेलन होणार आहे. या साहित्य परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी सोलापूर
जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात ज्यांची ओळख "शब्दप्रभू' अशी आहे ते माजी
मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची निवड करण्यात आली असून साहित्य परिषदेच्या या
महत्त्वपूर्ण पदाला खऱ्या अर्थी आयोजकांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे
विभागीय संमेलनाचे समन्वयक पद्माकर कुलकर्णी यांनी सांगितले. यासंदर्भात संमेलनाचे निमंत्रक तानसेन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, शाखेचे अध्यक्ष प्रकाश जडे यांच्या अध्यक्षतेखाली, कल्याण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये प्रामुख्याने ढोबळे यांची निवड करण्यात आली तर दिगंबर भगरे यांची कार्याध्यक्षपदी तर माजी प्राचार्य डॉ. सुभाष कदम यांची कार्यवाहपदी निवड करण्यात आली आहे. मंगळवेढ्याला संत चोखामेळा, संत दामाजी आणि कान्होपात्रा यांची साहित्य परंपरा आहे. मंगळवेढ्याच्या संत दामाजी नगरीत हे विभागीय साहित्य संमेलन होत असल्याने शाखेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्साह दाखवला आहे, असेही पद्माकर कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीत नटसम्राट बालगंधर्व स्मृती दिनाचे औचित्य साधून लक्ष्मण नागणे मसपा कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल कल्याण शिंदे, पत्रकारिता विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ. अतुल निकम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. दत्ता सरगर, मारुती कटकधोंड, संभाजी सलगर, लहु ढगे, सचिन गालफाडे, गोरक्ष जाधव, पोपट महामुरे, रेखा जडे, भारती धनवे आदी उपस्थित होते. | |||
