Advertisement
सातारा जिल्हाधिकाऱ्यांना बहुजन रयत परिषदेचे युवक अध्यक्ष सुरज शब्बीर मुजावर यांचे निवेदन
सातारा : मुस्लिम दफनभूमी, पीर जलालुद्दीन बाबा दर्गा, लक्ष्मी माता देवस्थान, कदम घराणे समाधी स्थळ या ठिकाणी जाण्यासाठी कागदोपत्री कुठलाही रस्ता नाही, त्यामुळे मुस्लिम समाजासह, लक्ष्मी माता भाविक आणि सामान्य नगारिकांची गैरसोय होत आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा तोपर्यंत सदर परिसरातील नागरिकांना येण्याजाण्यासाठी हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सातारा जिल्हा बहुजन रयत परिषदेचे युवक अध्यक्ष सुरज शब्बीर मुजावर यांनी केली आहे.
या मागणीबाबत तातडीने विचार केला नाही तर बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, महिला प्रदेशाध्यक्षा ऍङ कोमलताई साळुंखे-ढोबळे, प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलनासह, आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.
जुने सुपने येथे मुस्लिम समाजाचे पिढीजात कब्रस्तान आणि पीर जलालुद्दीन बाबा दर्गा तसेच कदम घराणे यांचे समाधी स्थळ आहे. याशिवाय पूर्ण सुपने गावचे ग्रामदैवत लक्ष्मी माता देवस्थान ही याच ठिकाण आहे. परंतु सदर ठिकाणाकडे जाण्यासाठी रस्ताच नाही. सदर ठिकाणाकडे तसेच हनुमान मंदिर, नदीकडे आणि पश्चिम सुपनेकडे जाणारा गावठाण हद्दीमधील पाणंद रस्ता शोधून तो 23 नंबर फॉर्मवर नोंद करून द्यावा. यातून मुस्लिम समाज, कदम घराणे, लक्ष्मी माता देवस्थान तसेच परिसरातील सर्व शेतकऱ्यांना सदर रस्त्याचा वापर करता येईल. सदर लोकोपयोगी मागणीचा गांभीर्याने विचार करावा, त्यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी सुरज मुजावर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सदर मागणीकडे दुर्लक्ष केले तर कराड तहसील कार्यालयासमोर 15 ऑगस्ट स्वातंत्र्यादिनी बहुजन रयत परिषदेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन सातारा जिल्हाधिकारी तसेच सातारा पोलीस अधिक्षक, कराडचे उपविभागीय अधिकारी, कराडचे तहसिलदार, कराडचे गटविकास अधिकारी, कराड पोलीस निरीक्षक, सुपनेचे ग्रामसेवक यांना निवेदनाच्या प्रत देण्यात आल्या आहेत.
