Advertisement
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गटाच्या मंत्र्यांना कोणती खाते मिळणार यावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. हा गोंधळ सुरु असतानाच, आता या मंत्र्यांना मंत्रालयात कोणत्या मजल्यावर कोणती कार्यालयं मिळणार? याचीही जोरदार चर्चा सुरू झाली. तर अजित पवारांना मंत्रालयात कुठलं कार्यालय मिळणार? याचीही चर्चा रंगू लागली आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं गेलं, पण त्यांना कुठलं खातं मिळणार यापेक्षा जास्त अजित पवार मंत्रालयात कुठे बसणार? त्यांचं कार्यालय सहाव्या मजल्यावर कार्यालय मिळणार की दुसऱ्या कुठल्या मजल्यावर? याबाबत आता शासन आणि प्रशासनात बैठकांचं सत्र सुरू आहे. मंत्रिमंडळात खातं जेवढं महत्वाचं, तेवढंच सहाव्या मजल्यावर कार्यालयही.. पण, सध्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि मुख्यसचिव यांचे कार्यालयं आहेत. त्यामुळे अजित पवारांचं कार्यालय कुठे असेल? याचीच सर्वांना उत्सुकता आहे.
