Advertisement
सोलापूर : सोलापूर
जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी हे मुख्य पक्ष दिसून येत असले तरी या दोन्ही
पक्षांच्या मतांची गोळाबेरीज बिघडविणारे अनेक लहान-मोठे पक्षही कार्यरत आहेत.
सध्याच्या घडामोडींनी जिल्ह्यातील लोकसभा तसेच विधानसभा मतदार संघात राजकीय
स्थितीलाही वेगळे वळण दिले आहे. भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार
गट) आगामी निवडणुकांपर्यंत एकत्रित राहिल्यास इतर लहान आणि नवख्या पक्षांमध्ये अनेक
जण प्रवेश करतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात पाळेमुळे
घट्ट रोवलेली ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांच्या नेतृत्त्वात कार्यरत असलेली बहुजन रयत
परिषद काय भूमिका घेणार, कोणत्या पक्षांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार यावरही
सोलापुरातील निवडणुकांचे गणित अवलंबून असणार आहे. कोणत्याही उमेदवाराला विजयी मताना
एक गठ्ठा मिळू शकेल, एवढी मतसंख्या बहुजन रयत परिषदेकडे आहे. याशिवाय माजी मंत्री
लक्ष्मणराव ढोबळे यांना सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळाली तसेच मोहळ
अथवा मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांना उमेदवारी दिली
गेली तर बहुजन रयत परिषदेची संपूर्ण ताकद त्यांच्या मागे असणार आहे.
राज्य
पातळीवरील सद्यस्थिती जर कायम राहिली तर आगामी निवडणुकांमध्ये भाजप, राष्ट्रवादी
(अजित पवार), शिवसेना (शिंदे) यांना आव्हान देणारे अनेक पक्ष सज्ज झालेले आहेत.
त्यामुळे लोकसभा तसेच विधानसभेसाठी या पक्षांना शंभर टक्के विजयाची खात्री
असलेल्यांना उमेदवारी द्यावी लागणार आहे. यामध्ये भाजपमध्ये माजी मंत्री लक्ष्मणराव
ढोबळे तसेच त्यांच्या कन्या ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांच्या नावाची चर्चा आहे तसेच
ऍड. कोमल साळुंखे यांच्या संपर्कात भारतीय राष्ट्र समिती अर्थातच बीआरएस पक्ष
असल्याने सोलापुरातून त्यांना उमेदवारी पक्की मानली जात आहे. परंतु, त्यांचे वडील
भाजपचे प्रांतीय सदस्य असल्याकारणाने त्यांच्या सूचनोनुसार त्या कोणताही राजकीय
निर्णय घेणार नाहीत हे स्पष्ट आहे. परंतु, माजी मंत्री ढोबळे यांच्या बाबत भाजपने
वेगळा निर्णय घेतला अथवा उमेदवासाठी डावलेले गेले तर ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांना
इतर पर्याय खुले असतील. सध्याचे राजकारण लक्षात घेता त्यांनी तशी तयारीही करून
ठेवली आहे.
सोलापुरात भारत राष्ट्र समिती (बीआरएस), आम आदमी पार्टी, प्रहार,
वंचित बहुजन आघाडी, एमआयएम हे पक्ष गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात
सक्रिय झालेले आहेत. सातत्याने जनसंपर्कात आहेत. यातील काही पक्ष प्रस्थापित
पक्षांचे पदाधिकारी आपल्या संपर्कात असल्याचा दावाही करीत आहेत. उल्लेख केलेल्या
सर्वच पक्षाशी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे तशी
वेळ आलीच तर ते आपली कन्या ऍड. कोमलताई यांच्यासाठी कोणत्याही पक्षातून उमेदवारीचे
तिकीट आणू शकतात. सध्या, माजी मंत्री ढोबळे हे काहीसे अलिप्त दिसत असले तरी ती
त्यांची स्टॅटर्जी असू शकते, याच कारणातून ढोबळे यांना कोणत्याही बाजुने डावलून
निर्णय घेणे भाजपसाठी धोक्याचे मानले जात आहे.
