Advertisement
इस्रोच्या हाती लागलं मोठं यश
मुंबई : चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर 23 ऑगस्ट 2023 रोजी यशस्वीरित्या उतरलं. आता 14 दिवसांचं संशोधन सुरु झालं आहे. यानंतर आता प्रज्ञान रोव्हरच्या माध्यमातून संशोधन सुरु झालं आहे. चंद्रावर कोणती खनिजं आहेत. तसेच वातावरणाचा अंदाज घेतला जात आहे. त्याचा पृथ्वीतलावर असलेल्या मानवी जीवनाला कसा फायदा होईल? याबाबत संशोधन केलं जात आहे. आता इस्रोच्या हाती मोठं यश लागलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने 29 ऑगस्टला सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत याबाबतची माहिती दिली आहे. सर्वात महत्त्वाचं मानवी जीवनासाठी आवश्यक असलेलं ऑक्सिजन सापडलं आहे. मानवी जीवनाला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. भविष्यात चंद्रावर मानवी वस्ती वसू शकते असे अंदाज बांधले जात आहेत.
दुसरीकडे, प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच पुढे जात हायड्रोजनचा शोध सुरु असल्याचं सांगितलं आहे. “चंद्रावरील संशोधन प्रगतीपथावर आहे. प्रथमच, इन-सीटू मापनांद्वारे, रोव्हरवरील ‘लेझर-इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप’ (LIBS) या उपकरणाने दक्षिण ध्रुवावर असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर स्पष्टपणे सल्फर (एस) शोधला आहे. आता हायड्रोजनचा शोध सुरु आहे.” , असं ट्वीट इस्रोनं केलं आहे. त्याचबरोबर चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन असल्याचं स्पष्ट झालं आहे. या व्यतिरिक्त अॅल्युमिनियम, सल्फर, कॅल्शियम, आयरन, क्रोमियम आणि टायटेनियम असल्याचं स्पष्ट झालं आहे.
