Advertisement
वाघेबाभुळगाव येथील कार्यक्रमात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केली खंत
बीड : समाजाच्या प्रश्नावर "बार्टी', अ,ब,क,ड मुद्यावरही आंदोलन केले. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणखी आंदोलन करताही येतील पण समाजाची घागर गळकी असल्याने आरक्षणाच पाणीत्यात घेऊ शकत नाही. घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वकाही समान वाटप केलेले असताना त्या "आरक्षणाच्या कापडा'चा शर्ट जेंव्हा आम्ही शिवला त्यावेळी तो मला बसला नाही, त्यामुळे प्रकाश आंबडेकर यांनी तो घालून पाहिला त्यांना तो बसलाही परंतु, वापरून झाल्यावर आरक्षणाचा तो शर्ट परत देण्याचे ते विसरले, अशी खंत बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केली.बिड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वाघेबाभुळगाव येथे ग्रामस्थांच्यावतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे, माजी मंत्री अशोकराव पाटील, माजी आमदार पृथ्वीराज साठे, बीआरपीचे स्वगताध्यक्ष अशोकराव जाधव, ज्येष्ठ नेते नंदुशेठ मुंदडा, आंबेजोगाई कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर, मा. सभापती संतोष हांगे, बजरंग सोनवणे, नंदुदादा मोराळे, बीआरपीचे सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर, ऍड. पूजा जाधव, राज्य संपर्क प्रमुख दत्ता पाटील, ना.म.साठे, मिनाक्षी सकट, दिलीप लोंढे, कचरू साळवे, पंढरीनाथ शिंदे, ए.बी.घायाळ, विक्रम ढोपले, ह.भ.प. प्रेमचंद कोकाटे, शिवाजीराव दराडे, श्रीकांत जाधव, सुनील वैद्य, विलास ठोंबरे, विशाल हावळे, संतोष जाधव, श्रीनिवास वाघ, अशोक आघाव, सिद्धु कायकर, कांताबाई इंगोले, बिभीषण पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री ढोबळे बोलत होते. ते म्हणाले की, सत्तेत असलेल्यांना जाब विचार, आमची कामे का झाली नाहीत, जोपर्यंत असे करणार नाही तोपर्यंत काम होणार नाहीत. गावात दारू शिरू देऊ नका. आपल्याच माणसांना पुढे करून ऍट्रासिटीचे काम काहीजण करतात, अशा प्रकरणात कोणाच्या हातचं आयतं कोलीत होऊ नका. आपल्या समाजाला इज्जत आहे. दिलेलं वचन पाळणारा समाज म्हणून बहुजन समाजाची आपल्यावर श्रद्धा आहे, त्यामुळे उग्रट वागून समाजाला कलंक लागेल, असे वागू नका. ऍट्रासिटीच्या नादाने बिघडू नका. पण, खरी अट्रासिटी असेल तर तो हक्क गाजवा. मतांचा शिक्का मारताना सगळे संघटीत व्हा. पण, चुकीचा निर्णय घेऊ नका, यातून समाजाच कल्याण होणार नाही. काटकसरीने पैसे सांभाळ. घरात चार पैसे राखूनच संसार केला पाहिजे. एकमेकांना सांभाळायला शिका, असे आवाहनही ढोबळे यांनी केले.
ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, झटल्याशिवाय परिवर्तन घडणार नाही, त्यासाठी आपल्याला एकत्र येऊन लढले पाहिजे. आपला लढा सत्तेसाठी नाही तर आपल्याच मातीत राहून स्वाभिमानाने जगता यावं, यासाठी आहे. ही लोकभावना तयार झाली पाहिजे, हे असलं जगण आपल्याच का बरं वाट्याला आलं. हा विचार ऊसतोड मजुरांच्या मनात किती तरी वेळा आला असेल पण करणार काय? पण, आज एवढंच सांगते की, बदल हा निसर्गाचा नियम आहे, तो घडणार आणि आपण सर्वजण मिळून घडवणारच, लक्षात ठेवा जिल्ह्याच्या मातीला बसलेला मागासलेपणाचा शिक्का पुसलाच पाहिजे. यासाठी सज्ज व्हा, तत्पर व्हा, असे अवाहनह त्यांनी केले. यावेळी त्यांनी माय-भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या.
महिला, विद्यार्थिंनी म्हणतात की, आम्ही ताईंचे भाषण ऐकण्यासाठी आलो
बाघेबाभुळगावात झालेल्या कार्यक्रमास मातंग समाजासह बहुजनांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये महिला-भगिनींनी उपस्थिती लक्षणीय होती. रक्षाबंधनाचा सण असतानाही गाव परिसरातील माता, भगिनींनी कार्यक्रमास मोठी गर्दी केली होती. ऍड. कोमलताई या सातत्याने भगिनींश संवाद साधत असतात, त्या कार्यक्रमास येणार असल्याने त्यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही आल्याचे अनेक महिला तसेच विद्यार्थिनींनी सांगितले.
