#

Advertisement

Wednesday, August 2, 2023, August 02, 2023 WIB
Last Updated 2023-08-02T11:41:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

संत गाडगेबाबा निवासी वसतीगृह शाळेतील विद्यार्थ्यांना उपचाराविना पाठविले परत

Advertisement

  • डोळ्यांची साथ; आरोग्य केंद्रात औषधांचा साठाच नाही
  • बहुजन रयत परिषदेचे कार्याध्यक्षा ऍड. शुभा पिल्ले यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार


तुळजापूर : राज्याच्या बहुतांशी सर्वच जिल्ह्यात डोळे येण्याची (कंजंग्टिवाइटिस) मोठी साथ आली आहे. व्हायरल इन्फेक्‍शनमुळे ही साथ वेगाने पसरत आहे. परंतु, या आजारासंदर्भातील कुठलीही औषध ग्रामीण आरोग्य केंद्रात उपलब्ध नसल्याची बाब संत गाडगेबाबा निवासी वसतीगृह शाळेतील विद्यार्थ्यांना उपचाराविना पाठविल्याने उघड झाली. याबाबत आरोग्य विभाग गंभीर नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुजन रयत परिषदेच्या कार्याध्यक्ष ऍड. शुभा पिल्ले यांनी निवेदनाद्वारे तक्रार केली असून सदर प्रश्‍नी तातडीने आदेश देण्याची विनंती केली आहे. तर, याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे या पाठपुरावा करीत आहेत. तर, याबाबत संबंधीत आरोग्य अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
तुळजापुर तालुक्‍यात मंगलुरू येथील संत गाडगेबाबा निवासी वसतीगृह शाळेतील काही विद्यार्थ्यांना डोळे दुखणे, लाल होणे अशी लक्षणे दिसू लागताच. प्रशासनाने तातडीने संबंधीत विद्यार्थ्यांना उपचारार्थ शासकीय आरोग्य केंद्रात नेले असता त्या ठिकाणी नेत्ररोग तज्ज्ञ तसेच औषधही उपलब्ध नव्हती. याबाबत निवासी डॉक्‍टरांकडे विचारणा केली असता, औषधांबाबत त्यांना काहीही माहिती नसल्याने शासकीय आरोग्य केंद्रातील डॉक्‍टर किती गांभीर्याने काम करतात हे लक्षात आले. डोळ्यांचा त्रास होणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी मेडिकल दुकानांतून औषध घेऊन देण्याचा प्रयत्न केला असता नेत्ररोगतज्ज्ञांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणतेही औषध दिले जात नाही. हा साथीचा आजार असल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यानंतरही प्रयत्नपूर्वक अशी औषधे खासगी मेडिकल मधून मिळवलीच तर नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला न घेता स्टेरॉइड्‌स असलेली डेक्‍सा, प्रेडनीसलोन, लोटेप्रेडनॅल, फ्लुरोमिथेलोन आदी औषधांचा वापर केल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर परिणाम होऊन काचबिंदू व मोतीबिंदूसारखे गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. शासकीय रुग्णालयात नेत्रतज्ज्ञ नाहीत, खासगी डॉक्‍टरांकडून तपासणी तसेच औषधे घेणे आर्थिकदृष्ट्या शक्‍य होत नाही, त्यामुळे डोळ्यांची वाढती साथ पाहता ग्रामीण आरोग्य केंद्रात औषधसाठा उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्य मंत्र्यांना तसेच संबंधीत यंत्रणेस तातडीने सूचना कराव्यात, अशी मागणी ऍड. पिल्ले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.