Advertisement
बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले स्पष्ट
लक्षवेधी प्रतिनिधीनांदेड : लोकशाहीचे चार स्तंभ मानले जातात तर पाचवा स्तंभ हा नागरिकच आहेत. बहुजन रयत परिषदेच्या बहुजन नागरिकांसाठी काम करीत आहे. न्याय हक्कासाठी आंदोलन, मोर्चे या माध्यमातून लढा देत असताना स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातूनही लोकशाहीच्या प्रशासकीय यंत्रणेतही आपल्या समाजाचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे, यासाठी नांदेडचे जिल्हाध्यक्ष साहेबराव गुंडीले यांनी राबविलेला स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, याचा लाभ समाजातील अधिकाधिक युवक-युवतींनी घ्यायला हवा, असे आवाहन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले.
नांदेड येथील राजयोग पॅलेसमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त बहुजन रयत परिषदेच्यावतीने मातंग समाजातील युवक-युवतींसाठी एमपीएससी परिक्षा तयारी मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्हाध्यक्ष साहेबराव गुुंडीले, भारत कलवले, नांदेड शहर सचिव प्रा. सी. एल. कदम आदी पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोफेसर डॉ. माधव बसवंत होते. राज्यसेवा अकॅडमी पुणेरी पॅटर्न, नांदेडचे प्रमुख प्रा. सज्जन कदम यांनी स्पर्धा परिक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष प्रा.ना.म.साठे, प्रदेश सचिव ईश्वर क्षीरसागर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठे होती. तसेच, बहुसंख्य युवती एमपीएससीच्या तयारीसाठी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना ऍड. कोमलताई म्हणाल्या की, बहुजन रयत परिषदेतर्फे असा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला, याचे मला खूप समाधान वाटले. स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ही काळाची गरज आहे. वंचीत समाजातील युवकांनी अशा परिक्षेच्या माधमातून मुख्य प्रवाहात यायला हवे. मातंग समाज भरकटत चालला आहे. समाजाला योग्यवेळी सावरण्याची गरज आहे. यासाठी युवा पिढीचे प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहेत. मनात आणले तर स्पर्धा परिक्षेत आपण सहज यशस्वी होऊ शकतो. आता, यापुढे नशिबाला दोष देत बसण्याची वेळ नाही तर नशीब घडविण्याची वेळ आहे. मनातील नकारात्मक विचार बाजूला काढा. क्षमता असूनही आपल्याला पुढे जाता येत नाही, कारण योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळेच संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम योग्य आणि समाजाला दिशा देणारा आहे. बहुजन रयत परिषद वंचीत घटकांच्या हितासाठी काम करते, यासाठी वेळ प्रसंगी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरते, अशा कामाबरोबरच समाजाच्या प्रगतीसाठी असे उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचेही ऍड. कोमलताई यांनी नमूद केले.
गुंडिले यांच्या कामाचा धसका : ऍड. कोमलताई
नांदेडचे जिल्हा अध्यक्ष साहेबराव गुंडिले समाजाच्या कामासाठी नेहमीच पुढे असतात. आंदोलन असो, मोर्चे असो त्यांचा सहभाग असतोच याशिवाय असे स्तुत्य उपक्रम राबविण्यातही ते अग्रेसर आहेत, त्यांनी केलेले "बोंब मारो आंदोलन' आजही लोक आणि प्रशासकीय अधिकारी विसरलेले नाहीत, गुंडिले यांच्या कामाचा धसका शासकीय अधिकाऱ्यांनी इतका घेतला आहे की, काम करा नाहीतर गुंडिले बोंब मारत येतील, असे म्हटले जाते. एखादा पदाधिकारी कार्यकर्ता किती प्रभावशाली काम करू शकतो गुंडिले हे त्याचे उदाहरण आहेत. पद हे मिळवायची गोष्ट नाही तर ती जबाबदारी आहे, ही जाणीव आणि भान जपता आले पाहिजे.
मला समाधान वाटले : माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे
नांदेडचे जिल्हाध्यक्ष साहेबराव गुंडीले, अध्यक्ष भारत कलवले, माधव बसवंते यांनी स्पर्धा परिक्षेबद्दल माहिती देण्याचा उपक्रम राबविला. याचे मला खूप समाधान वाटले. मान्यवर आयोजकांनी मांडलेली भूमिका योग्य वाटली. व्यसनमुक्त समाजासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. समाजातून एखादा शासकीय अधिकारी, पोलीस निरीक्षक अशा पदांवर जाण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावेत.
कामांचे सार्थक होईल : जिल्हाध्यक्ष साहेबराव गुंडीले
नांदेडमध्ये दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम राबविला जातो. मातंग समाजातील युवक-युवती स्पर्धा परिक्षांबाबत जागरुक व्हावेत हाच यामागील उद्देश आहे. यातून एखादा एखादा जरी अधिकारी निर्माण झाला, तर आमच्या या कामांचे सार्थक झाले, असे मला वाटते.
- राज्यसेवा अकॅडमी पुणेरी पॅटर्न, नांदेडचे प्रमुख प्रा. सज्जन कदम यांनी यावेळी एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी., पी.एस., टी.आय., एस.सी., एस.आय., ए.एस.ओ. इतर व परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले.


