Advertisement
अमरावती : चांदूर तालुक्यातील घुईखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चक्क चौथ्या वर्गाचे विद्यार्थी पहिल्या, दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक हे गावात सर्वेक्षणाकरता जात असल्याचे चौथीचे विद्यार्थ्यी पहिल्या दुसरीच्या मुलांना शिकवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव असल्याने शिक्षकांना हे काम करावं लागतं असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
याबाबत शिक्षकांना विचारले असते त्यांनी सांगितले की सारक्षता अभियान सुरु असल्याने सर्व शिक्षिका साक्षरता सर्वेसाठी गावात गेल्या आहेत. सरांनी एक दोन तासांसाठी असे शिकवण्यास सांगितले आहे. वरून दबाव असल्यामुळे आम्हाला हे सगळं काम 24 तारखेच्या आत पूर्ण करुन द्यायचं आहे असे शिक्षिकेने सांगितले," असे अफसर पठाण या पालकाने सांगितले.
दरम्यान, देशात नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्या अंतर्गत 15 वर्षे आणि त्या पुढील वयाच्या निरक्षरांचा शोध घेण्यासाठी राज्यात 17 ते 31 ऑगस्ट यादरम्यान सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रमातून राज्यात 2023-24 मध्ये 12 लाख 40 हजार निरक्षर नागरिकांचा शोध घेण्यात येणार आहे.
