Advertisement
भंडारा : तलाठी भरती प्रक्रियेमध्ये सर्व्हर डाऊन झाले. त्यामुळे तब्बल अर्धा ते पाऊण तास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर थांबावे लागले. तब्बल पाऊण तासानंतर सर्व्हर सुरळीत सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार हे ईडीचं नव्हे तर, येड्यांचं सरकार आहे. दोन हजार जागांसाठी 15 – 15 लाख अर्ज येतात. त्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये प्रवेश शुल्क आकारल्या जाते. अरबो रुपये जमा केले जात आहे.
तलाठी परीक्षा घेणारी प्रायव्हेट कंपनी याचा सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा वाटा आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय. या पद्धतीच्या कधी पेपर फूट तर, कधी सर्व्हर डाऊन दाखविले जातात. यातून सुशिक्षित बेरोजगार युवकांचे आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण सरकारकडून केले जाते. त्याचाच परिणाम आज बघायला मिळत आहे. तरुणांच्या विरोधातील हे सरकार आहे. मुद्दाम हे येड्यांचं सरकार पाप करीत असल्याची घणाघाती टीका नाना पटोले यांनी तलाठी परीक्षेच्या सर्व्हर डाऊनबाबत बोलताना केली.
