Advertisement
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात 41 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. राजकीय कोपरखळ्यांनी हा कार्यक्रम गाजला. यावेळी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर आले.
नरेंद्र मोदींना आज लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते शरद पवार. बऱ्याच वर्षांनी मोदी आणि पवार एका व्यासपीठावर आले होते. निमित्त पुरस्काराचं असलं तरी पार्श्वभूमी सरकारमध्ये पवारांच्या विरोधात जाऊन सहभागी झालेल्या अजित पवारांच्या बंडाची ही होती.
स्टेजवर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यासमोर गेले, हस्तांदोलन केलं. फडणवीसांनीही पवारांची भेट घेतली मात्र अजित पवारांनी शरद पवारांच्या समोर जाणच टाळलं. पवारांनी भाषण करताना मोदींचं तोंडभरून कौतुक केलं पण सर्जिकल स्ट्राईक पहिला शिवाजी महाराजांचाच होता, असं म्हणत चिमटे ही काढले.
शरद पवार आधीच येऊन बसले\\\
कार्यक्रमाच्या सुरूवातीला शरद पवार जवळपास 10 मिनिट आधीच एकटेच व्यासपीठावर येऊन बसलेले होते. अगदी कालपर्यंत पवारांनी पुरस्कार सोहळ्याला जाऊ नये म्हणून पक्ष कार्यकर्ते, पुरोगामी संघटना प्रयत्न करत होते पण हा पुरस्कार घ्यावा अशी विनंतीच टिळकांच्या वतीने शरद पवार यांनी मोदींना केली होती. त्यामुळे पवारांनी कार्यक्रमाला न जाण योग्य नाही, असं त्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं. एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर आणि नेते स्टेजवर असं चित्र आज पाहायला मिळालं.

