Advertisement
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, "लक्षवेधी'च्या संपादीका ऍड. कोमलताई यांना विशेष आमंत्रण
"लक्षवेधी' प्रतिनिधीदिल्ली : उत्तर प्रदेशातील मथुरा येथील भाजप खासदार हेमा मालिनी यांचे "चल मन वृंदावन' या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते करण्यात आले. नृत्यमय कार्यक्रमाद्वारे प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात झाला.
महराष्ट्र सदनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे तसेच बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे आणि "लक्षवेधी'च्या टीमला विशेष आमंत्रण होते. स्वत: संपादक असलेल्या हेमा मालिनी यांचे हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले. माजी मंत्री ढोबळे साहेब आणि "लक्षवेधी'च्या संपादीका ऍड. कोमलताई यांनी हेमा मालिनी यांना पुस्तक प्रकाशनाच्या शुभेच्छा दिल्या.
हेमा मालिनी यांनी "चल मन वृंदावन'च्या प्रकाशनामागील प्रेरणा, त्याचा उद्देश आणि ब्रजचे सांस्कृतिक महत्त्व याविषयी सविस्तरपणे सांगितले. त्या म्हणाल्या की, ब्रजच्या पवित्र भूमीचे गूढ आकर्षण दाखवणारे हे सुंदर "कॉफी टेबल बुक' सादर करताना मला आनंद होत आहे. राजकारण, संस्कृती आणि कलेच्या अनेक वर्षांच्या सक्रियतेने मला जाणवले की माझ्यातील कलाकार ब्रजच्या प्रत्येक पैलूचा शोध घेण्यासाठी किती उत्सुक आहे.
या महान देशाच्या आदरणीय भूतकाळाने माझे विचार मंत्रमुग्ध झाले आहेत आणि नृत्य, गाणे आणि नाटकाच्या माध्यमातून ते रंगमंचावर जिवंत करण्याची इच्छा माझ्या मनात जागृत राहिली. माझा प्रवास हा त्या आनंदाच्या शोधात आहे आणि हे कॉफी टेबल बुक या प्रवासाचा एक भाग आहे. हे पुस्तक शाश्वत वृंदावनाच्या सुंदर भावनेवर आधारित आहे. वृंदावन म्हणजे काय? विविध पार्श्वभूमीतील लोकांना पवित्र वृंदावन शहराकडे कशामुळे आकर्षित केले जाते? येथे संत येतात. कलाकार, विद्वान किंवा चैतन्य महाप्रभू, स्वामी हरिदास ते पंडित जसराजजी वृंदावनात येऊन गात असत. मीराबाई असो, सूरदास असो, सर्व संत येथे आले आहेत. वृंदावन हे नेहमीच आकर्षणाचे ठिकाण ठरले आहे. भगवान श्रीकृष्णावर माझी खूप श्रद्धा असल्याचेही त्यांनी सांगितले. हे पुस्तक वाचकाला आपण वृंदावनात पोहोचल्यासारखे वाटेल. यावेळी त्यांनी या पुस्तकाबचे प्रकाशक डॉ. अशोक बन्सल आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.
फॅशन शो ठरला खास...
यावेळी प्रकाशन सोहळ्यात सुप्रसिद्ध डिझायनर सुलोचना मोंगा यांनी आयोजित केलेल्या फॅशन शोमध्ये वृंदावन या अध्यात्मिक शहराचा वारसा आणि सांस्कृतिक स्थळांचे प्रतिनिधित्व दिसले. यावेळी हेमा मालिनी यांनी "भगवान कृष्णा'वर आधारित गाण्यावर अभिनय केला. पुस्तक प्रकाशनावेळी सहसा फॅशन शो होत नाहीत. पण श्रीकृष्ण तसेच मधुरेवर आधारित वेशभुषा, संगीत यामुळे हा शो खास ठरला.
"लक्षवेधी'च्या संपादीका ऍड. कोमलताई म्हणाल्या की....
खासदार हेमा मालिनी यांच्या "चल मन वृंदावन' या कॉफी टेबल बुकची पहिली प्रत त्यांना सादर केली. त्या स्वत: खासदार असल्या तरी त्यांच्यातील कलावंत आजही तेवढ्याच ताकदीने जागा आहे. या पुस्तकात 50 लेख आणि सुमारे 150 चित्रांच्या मदतीने ब्रजचा इतिहास, मंदिरे, महत्त्वाची ठिकाणे अनेक व्यक्तिमत्त्वे, सण-उत्सव याबाबत माहिती देण्यात आली आहे. संपादक म्हणून अशा पुस्तकावर काम करणे खूप मोठे आव्हानच आहे. ते हेमा मालिनी यशस्वीरित्या साध्य केले. त्याबद्दल त्यांच्या या कामाला माझ्या तसेच लक्षवेधी टीमकडून मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत.
