Advertisement
| ऍड.
कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची टीका पुणे : राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या राजकीय पक्षांना सत्तेशिवाय काहीच दिसत नाही. शासन महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्यमान भारत यासारख्या मोठ्या योजना राबवित आहे. मात्र, त्याचवेळी राज्यात पसरणारे साथीचे आजार रोखण्यासाठी शासनाची आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे, याचा प्रत्यय राज्यातील जनता सध्या घेत आहे, अशी टीका बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केली. सोलापूर जिल्ह्यातील तुळजापुर तालुक्यातील मंगलुरू गावातील आश्रम शाळेसह राज्यभरातील अनेक शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना डोळे येणे संसर्ग झाला आहे. अशा शाळांतील विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याकारणाने त्यांना शासकीय रूग्णालयांवरच अवलंबून रहावे लागेते परंतु, डोळे येणे आजारासंदर्भातील कुठलीही औषधे सध्या शासकीय रुग्णालयात उपलब्ध नाहीत किंवा नेत्रतज्ञही उपलब्ध नाहीत, यापार्श्वभूमीवर अनेक तक्रारी बहुजन रयत परिषदेकडे आल्या आहेत. त्यामुळे सदर बाब शासनाच्या निदर्शास आणून देण्यासाठी परिषदेकडून प्रयत्न केले जात असून याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ऍड. कोमलताई बोलत होत्या. यावेळी कार्यकारी ऍड. शुभा पिल्ले, ईश्वर क्षिरसागर उपस्थित होते. ऍड. कोमलताई म्हणाल्या की, ज्या जनतेच्या जीवावर राज्यकर्त्यांनी सत्तेची खुर्ची मिळवली, ती जनता साथीच्या विळख्यात अडकली आहे. मात्र, सत्तेची झापडं लावलेल्या शासनाला जनतेचे हाल दिसत नाहीत. त्यामुळे आम्हाला कुणी वाली आहे की नाही, अशी संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे. जनतेला वेळेत आरोग्य सुविधा मिळणार नसतील तर, सवलतीच्या जाहिराती करून काहीच उपयोग नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. वैद्यकीय विभाग व तेथील अधिकाऱ्याच्या ढिसाळ कारभारामुळे राज्यात डोळ्याची साथ वाढली आहे. राज्यभरातील निवासी शाळांमध्ये त्याची लागण झाली आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने शासनाने तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करायला हवे होते. मात्र, शासनाकडेच या आजाराबाबत ठोस उपचार व डोळ्याचे ड्रॉप नाहीत. सरकाराचे या आजाराकडे लक्ष नाही, अशीही टिका त्यांनी केली. डोळ्यांचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने शाळांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी यासंदर्भात बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना ट्विटरवरून मेजेज पाठवला ओह. आरोग्यमंत्र्यांना मेलद्वारे पत्रव्यवहार केला. परंतु, ढिसाळ यंत्रणेमुळे दोन्ही मेजेस त्यांना पोहोचले नाहीत. आपत्कालीन परिस्थितीत मदत मागण्यासाठी मंत्र्यांचे मेल, ट्विटर काम करीत नसेल तर सर्वसामान्य माणसाने करायचे तरी काय? असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे. आरोग्य विभागाने आता तरी तत्काळ राज्यातील सर्वच शाळांमध्ये आरोग्य शिबिरे घेऊन विद्यार्थांच्या डोळ्यांची तपासणी करावी, राज्यभर पसरलेली डोळ्यांची साथ आटोक्यात आणण्यासाठी ठोस उपयायोजना करावी, अन्यथा बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराविरोधात राज्यभरात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा ऍड. कोमल साळुंखे यांनी दिला आहे. | |||
