Advertisement
सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. मात्र, गुवाहाटीला गेलेले हा आरोप सातत्याने फेटाळत होते. विरोधकांच्या या आरोपामुळे त्या आमदारांची राज्यात खूप बदनामी झाली. शिवसेना आमदार यांच्यासोबत काही अपक्ष आमदारही गुवाहाटीला गेले होते. त्यातील मंत्रीपदाची आस असलेले आमदार बच्चू कडू यांचाही समावेश होता. अखेर, आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन आपल्याला काय मिळाले याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
सांगली येथे दिव्यांग बांधवांच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे उद्घाटन आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मी दहावेळा दिव्यांग मंत्रालय उभारा ही मागणी केली. राज्यमंत्री असूनही माझी मागणी पूर्ण झाली नाही, असे ते म्हणाले. गुवाहाटीला जाण्यामुळे आमची राज्यात खूप बदनामी झाली. पण त्याची पर्वा नाही. त्या बदनामीच्या बदल्यात आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं, असे सांगत बच्चू कडू यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारही मानले.
