Advertisement
औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा
औरंगाबाद : औरंगाबादच्या जिल्हा नियोजन बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. निधी वाटपावरून या दोन्ही शिवसैनिकांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे डीपीडीसीची बैठक वादळी ठरली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री संदीपान भुमरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. कन्नडचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी या बैठकीत निधीचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या मतदारसंघात एक पैसाही मिळाला नसल्याचं राजपूत म्हणाले. त्यावर जिल्हाधिकारी त्याबाबत तुम्हाला पत्र देऊन खुलासा करतील, असं पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितलं. पण भुमरे यांचं उत्तर उडवाउडवीचं वाटल्याने अंबादास दानवे यांनी या उत्तराला आक्षेप घेतला.
विरोधी पक्षाच्या आमदारांना तुम्ही निधीच देत नाही. केवळ विरोधी पक्षाचे आमदार आहेत म्हणून निधी नाकारला जातो. तुमच्याकडून पक्षपातीपणा होतोय, असा आरोप दानवे यांनी केला. त्याला भुमरे यांनीही प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. बैठकीचं वातावरण तापलं. संतप्त झालेले दानवे उभे राहून बोलू लागले. तावातावाने दानवे बोलत होते. तर भुमरे बसूनच दानवे यांच्या प्रत्येक विधानाचा समाचार घेत होते.
