Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाची काल बीडमध्ये सभा झाली. या सभेत अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांनी धडाकेबाज भाषणं केली. या सभेवर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. या सभेची तुलना त्यांनी अजित पवारांच्या बारामतील सभेशी केली आहे. ट्विट करत रोहित पवार यांनी निशाणा साधला. अजित पवार यांच्या बीडमधील सभेसाठी एका मंत्र्याने सत्तेचा पुरेपुर वापर केला. पण महाराष्ट्रातील जनता हुशार आणि स्वाभिमानी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
रोहित पवार यांचं ट्विट
बीडमध्ये मोठं स्वागत झालं पण एका मंत्र्याने त्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर केला, हेही नजरेआड करता येणार नाही. या सभेत जेंव्हा आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले त्याला लोकांनीच विरोध केल्याने संबंधित मंत्र्याला दोन मिनिटांत आपलं भाषण गुंडाळावं लागलं. बाकी संपूर्ण सभेत जेंव्हा भाजपाची आरती गायली गेली तेंव्हा बारामतीप्रमाणेच स्वाभिमानी बीडकरांनीही एकही टाळी वाजवली नाही आणि खुर्च्याही रिकाम्या व्हायला लागल्या, यातच सर्व आलं…. कारण बारामती असो किंवा बीड… संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हुशार आणि स्वाभिमानी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
