Advertisement
पुणे : राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. केंद्राने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदिल दाखवल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता या विस्तारात संधी मिळावी म्हणून इच्छुकांची लॉबिंग सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वासोबत राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली आहे. या चर्चेत पुढील आठवड्यात विस्तार करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात हा विस्तार होणार असून मंत्रिपदाची माळ मिळावी म्हणून अनेक इच्छुकांनी लॉबिंग सुरू केल्याचंही सूत्रांनी सांगितलं. राज्याच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच हा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण हा विस्तार झाला नाही. आता अधिवेशनही संपलं आहे. तसेच निवडणुकांना 7 ते 8 महिने बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर हा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शाह यांची जे. डब्ल्यू मेरिएट हॉटेलात भेट घेतली. यावेळी या चारही नेत्यांची 40 मिनिटे चर्चा झाली. राज्यातील राजकीय घडामोडी आणि राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
