Advertisement
कॉंग्रेसच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपकडून प्रबळ दावेदार
सोलपूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून प्रणिती यांना जोरदार लढत देऊ शकणाऱ्या तुल्यबळ उमेदवाराचा शोध घेतला जात असताना भाजपकडून सोलापूर लोकसभेच्या प्रबळ दावेदारांमध्ये ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे, ऍड. शरद बनसोडे, राजाभाऊ सरवदे, अमर साबळे, दिलीप कांबळे तसेच विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी ही नावे पहिल्या यादीत समाविष्ट असल्याचे सांगितले जात आहे. इतर उमेदवारांच्या तलुनेत महिला उमेदवारासमोर महिला उमेदवार म्हणून ऍड. कोमलताई यांचे नाव यादीत क्रमांक 1 वर असल्याचीही माहिती मिळत आहे.सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून आगामी काळात आपण निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा माजी केंद्रीय गृहमंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. तर, जातीच्या दाखल्याप्रकरणी विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तर, मोदी लाटेत ऍड. शरद बनसोडे यांनी निवडणूक जिंकली होती. या सर्वांच्या तुलनेत राजाभाऊ सरवदे नवखे मानले जातात. याच कारणातून सोलापुरात लोकसभेला कॉंग्रेसकडून प्रणिती शिंदे उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच उमेदवार असतील, हे निश्चत मानले जात आहे.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस विरूद्ध भाजप असा थेट सामना आहे. त्यामुळे येथे तेवढ्याच ताकदीचा उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यामागे कारणही तसेच सांगितले जात आहे. कारण, लोकसेभपूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिजोरम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक होत आहे. पुढील काही दिवसांत या राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखाही जाहीर होतील. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस सत्तेवर आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजपा आणि तेलंगणमध्ये बीआरएस या पक्षाची सत्ता आहे. या पाच राज्यांत विधानसभेच्या निकालावरच लोकसभेचे विजयी आकडे ठरणार आहेत. या पाच राज्यांपैकी केवळ मध्यप्रदेशात भाजपाची सत्ता आहे. इतर चार राज्यांत विरोधात निकाल गेला तर त्याचा परिणाम इतर राज्यांतही होऊ शकतो, याच कारणातून महाराष्ट्रात भाजप सावध भूमिकेत असून भाजपने "मिशन 48'ची तयारी सुरू केली आहे. या "मिशन 48' मध्ये सोलापूर लोकसभेचाही उल्लेख तथा समावेश आहे.
सध्या सोलापूर मतदार संघात भाजपचे विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी असले तरी जातीचा दाखला प्रकरणामुळे त्यांना पुन्हा संधी देण्याचा धोका भाजप घेणार नाही. परंतु, सोलापूर मतदार संघ आपल्याकडे ठेवण्यासाठी तेवढ्याच ताकदीचा उमेदवार भाजपला हवा आहे, याच करणातून कॉंग्रेसच्या महिला उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपकडून महाराष्ट्राचे प्रवक्ते माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या नावाला प्राधान्य दिले जात आहे. ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्याकडे बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून असलेली स्वतंत्र "वोटबॅंक', उच्च शिक्षित महिला, शाहु शिक्षण संस्थेची हक्काची मतं याशिवाय वडील लक्ष्मणराव ढोबळे यांचा भक्कम "सपोर्ट' याशिवाय वंचीत समाजासह बहुजनांमध्ये तळागळात असलेली स्वतंत्र ओळख ही ऍड. कोमलताई यांची बलस्थाने मानली जात आहेत. याच कारणातून सध्या सोलापूर लोकसभेच्या प्रबळ दावेदारांमध्ये त्यांचे नाव क्रमांक 1 वर आहे.
मतांच्या गोळाबेरीजमध्येही ऍड. कोमलाताई आघाडीवर
आमदार प्रणिती शिंदे यांच्या तोडीचा उमेदवार निवडताना भाजपने स्थानिक उमेदवाराला प्राधान्यक्रम द्यावा, अशी पक्षातील काहींची मागणी आहे. त्यामुळे या स्पर्धेत ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे, ऍड. शरद बनसोडे, राजाभाऊ सरवदे यांची नावे आघाडीवर आहेत. सोलापूर शहरात असणाऱ्या भाजपच्या दोन गटांपैकी एका गटाने माजी मंत्री दिलीप कांबळे यांचे तर दुसऱ्या गटाने माजी खासदार अमर साबळे यांचे नाव पुढे केले असले तरी मतांची गोळाबेरीज पाहता यामध्ये ऍड. कोमताई ढोबळे या आघाडीवर आहेत.
अजित पवार आणि लक्ष्मणराव ढोबळे यांचे चांगले संबंध
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दोन गट झाले आहेत. यातील अजित पवार गट सध्या भाजप सोबत आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात त्यांचा फायदा 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला होणार आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभेचा उमेदवार ठरविताना भाजपला अजित पवार यांनाही विचारात घ्यावे लागणार आहे. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आहेत तसेच अजित पवार यांच्या बरोबरही ढोबळे यांचे चांगले संबंध आहेत, याचा फायदा कन्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या उमेदवारीसाठी ते करून घेऊ शकतात.